घरदेश-विदेशLok Sabha 2024: जाहीरनामा समजावून सांगतो, वेळ द्या; खर्गेंचं मोदींना पत्र

Lok Sabha 2024: जाहीरनामा समजावून सांगतो, वेळ द्या; खर्गेंचं मोदींना पत्र

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांना भेटून काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करायची आहे, असे ते म्हणाले. जेणेकरून देशाचे पंतप्रधान या नात्याने पंतप्रधान मोदींनी चुकीची विधानं करू नयेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर ‘संसाधनांचे पुनर्वितरण’ आणि ‘वारसा कर’ चा आरोप केल्यानंतर खर्गे यांनी हे पत्र लिहिलं आहे. (Lok Sabha Election 2024 Congress chief Mallikarjun Kharge asked for time to meet Pm Modi over Party Manifesto)

काँग्रेसने एप्रिल महिन्याच्या पाच तारखेला लोकसभा निवडणूक 2024 साठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘न्याय पत्र’ असे नाव दिले आहे. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, बेरोजगार आणि तरुणांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्ला चढवला होता. आता यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, तसंच भेटण्यासाठी वेळही मागितला आहे.

- Advertisement -

खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

अलीकडील काही सभांमध्ये, पंतप्रधानांनी अनेक वेळा सांगितले की, काँग्रेसचा लोकांच्या मालमत्ता हिसकावून ‘विशिष्ट समुदायांच्या’ वाटण्याचा डाव आहे. यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, गेल्या काही दिवसांतील तुमची भाषा आणि भाषणे पाहून मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीनंतर तुम्ही आणि तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडून असे बोलणे अपेक्षित होते.

काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधानांना आव्हान

खर्गे यांनी पत्रात दावा केला आहे की, काही शब्द संदर्भाबाहेर काढणे आणि नंतर जातीय तेढ निर्माण करणे ही पंतप्रधानांची सवय झाली आहे. असे बोलून तुम्ही पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करत आहात, असे काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले. जेव्हा निवडणुका संपतील तेव्हा लोकांच्या लक्षात येईल की, पंतप्रधानांनी पराभवाच्या भीतीने अशी वक्तव्य केली होती.

- Advertisement -

तुमचे सल्लागार चुकीची माहिती देतात ​

काँग्रेस अध्यक्षांचं म्हणणं आहे की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टींबाबत पंतप्रधानांची त्यांच्या सल्लागारांकडून दिशाभूल केली जात आहे. खर्गे म्हणाले की, मला तुमची व्यक्तिश: भेट घेऊन आमच्या जाहीरनाम्याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करायची आहे. देशाचे पंतप्रधान या नात्याने तुम्ही चुकीची विधाने करू नयेत. खर्गे म्हणाले की, आमचा जाहीरनामा भारतातील लोकांसाठी आहे, मग ते हिंदू असोत, मुस्लीम असोत, ख्रिश्चन असोत, शीख असोत, जैन असोत की बौद्ध असोत.

(हेही वाचा: Lok Sabha 20024: प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करणार; पंकजांच्या वक्तव्याने खळबळ)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -