Lok Sabha 2024 : वाढता वाढता वाढे… सांगलीच्या खासदाराची संपत्ती 5 वर्षांत 29 कोटींनी वाढली

Lok Sabha 2024 : वाढता वाढता वाढे… सांगलीच्या खासदाराची संपत्ती 5 वर्षांत 29 कोटींनी वाढली

सांगली – सांगली लोकसभा निवडणूक विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे राज्यात चर्चेत आली आहे. खासदार संजय राऊत यांनी विशाल पाटील यांची समजूत काढली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र अजून त्यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. त्यामुळे सांगलीत भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि मविआ बंडखोर अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान तिन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यासोबत देण्यात आलेल्या शपथपत्रानुसार या उमेदवारांच्या मलमत्तेचाही तपशील समोर आला आहे. तिसऱ्यांदा लोकसभा लढवणारे भाजप खासदार संजय पाटील यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात तब्बल 29 कोटींची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

खासदार संजय पाटलांची संपत्ती 29 कोटींनी वाढली

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय पाटील हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता 45 कोटी 82 लाख 93 हजार रुपये किंमतीची आहे. तर त्यांची जंगम मालमत्ता 2 कोटी 8 लाख 45 हजार रुपये आहे. त्यांची एकूण मालमत्ता 48 कोटी 31 लाख 39 हजार रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. गेल्या पंचवार्षिकला त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या 29 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
खासदार संजय पाटील यांच्या पत्नी ज्योती यांच्या मालमत्तेचा तपशील वेगळा आहे. ज्योती पाटील यांनी त्यांच्या एकूण जंगम मालमत्तेपैकी 32 कोटी 31 लाख रुपये एसजीझेड अँड एजीए शुगर कंपनीला दिले आहेत. त्यांच्याकडे 24 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आहेत.

चंद्रहार पाटलांकडे 1 कोटी 80 लाखांची मालमत्ता

महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले चंद्रहार सुभाष पाटील यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून एक कोटी 80 लाखांची मालमत्ता आहे. तर त्यांच्यावर साडेचार लाख रुपयांचे कर्ज आहे.
इतर संपत्तीमध्ये चंद्रहार पाटील यांच्याकडे 65 चांदीच्या गदा, वाहन आणि दोन लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम असल्याचे शपथपत्रात सांगण्यात आले.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; पहिल्याच सभेत अजित पवारांना म्हटले दुर्योधन

विशाल पाटील यांची संपत्ती 30 कोटींची

महाविकास आघाडीत सांगली मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. येथून प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे एकूण 30 कोटी 52 लाखांची संपत्ती आहे गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मालमत्तेत आठ कोटी 80 लाखांची वाढ झाली आहे.
तर त्यांचे कर्जही  कमी झाले आहे. त्यांच्या पत्नीकडे तीन कोटी 75  लाखांची मालमत्ता आहे.
त्यांच्या पत्नीच्या नावावर  61 लाख 76  हजार 989 रुपयांचे कर्ज आहे तर दोघांचे मिळून 7 कोटी 65 लाख रुपयांचे कर्ज आहे.

तिसऱ्या टप्प्यात सांगलीत निवडणूक 

सांगली लोकसभेसाठी राज्यातील तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे. विशाल पाटील त्यांची उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात, यावर सांगलीचे गणित अवलंबून असणार आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचा सांगलीचा तिढा मिटणार; राऊत म्हणाले, विशाल पाटील आमचे…

First Published on: April 20, 2024 12:18 PM
Exit mobile version