हे पाहून डोक्याला झिणझिण्या येतात!

हे पाहून डोक्याला झिणझिण्या येतात!

प्रातिनिधिक फोटो

कधी काळी निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार फक्त नमस्कार करून मत देण्याची विनंती करीत असत, आता मात्र मतांसाठी पडणारा पैशांचा पाऊस पाहिल्यानंतर डोक्याला झिणझिण्या येतात, अशी प्रतिक्रिया काही बुजुर्गांनी कुणाशी वाईटपणा नको म्हणून नाव छापू नका, या अटीवर दिली.

सध्याच्या राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलले आहेत. नितिमत्ता हा विषय केव्हाच बासनात गुंडाळला गेल्याने प्रत्येक उमेदवार आपल्या विजयासाठी कोणत्याही थराला जात असल्याचे चित्र सर्वत्रच दिसते. याकरिता काही बुजुर्गांना राजकारणाच्या सद्यःस्थितीबाबत बोलते केले. तेव्हा त्यांनी आपली नाराजी न लपवता दिलखुलास, मात्र परखड मते व्यक्त केली. अलिकडे राजकारणात कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो, या वाक्याचा राजकारणी फार सोयीने अर्थ लावून घेतात. कालपर्यंत एकमेकांचे गळे घोटायला निघालेल्यांमध्ये एका दिवसात स्नेहाचे संबंध कसे काय निर्माण होऊ शकतात, असा सवाल एकाने केला. कोडगेपणा हा राजकारणासाठी खूपच सोयीचा व फायदेशीर ठरू लागल्याचेही ते म्हणाले.

पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये डामडौल पहावयास मिळत नव्हता. जाड्याभरड्या कापडाचे शिवलेले कपडे अंगावर दिसत असत. फिरण्यासाठी एखादी जीप असली तरी तो उमेदवार श्रीमंत वाटायचा. आता मात्र प्रत्येक उमेदवाराचा पेहराव व त्याच्याकडील वाहन पाहिले म्हणजे डोळे दिपून जातात. गेल्या पंचवीस वर्षांपर्यंत उमेदवाराचे पाठीराखे प्रचारासाठी मोडके तोडके किंवा मिळेल ते वाहन वापरत असत. आता मात्र कार्यकर्त्यांची फौज व त्यांच्या दिमतीला अलिशान मोटारींचा ताफा पाहिल्यानंतर यांच्याकडून हा पैसा येतो तरी कुठून, असा विचार मनात येतो असे एका निवृत्त शिक्षकाने सांगितले.

एक काळ असा होता की, कार्यकर्ते स्वतः घरची भाजी-भाकरी आणून हिरीरीने प्रचार करताना दिसत होते. उपाशीपोटीही प्रचार करणारे हाडाचे कार्यकर्ते आम्ही पाहिले आहेत, परंतु आता तुम्ही आमची काय सोय करणार, हे विचारूनच प्रचाराला कार्यकर्ते येतात. बरं, या सर्वांना हॉटेलचे चमचमीत जेवण व पिणारे असतील त्यांना यथेच्छ दारू ढोसण्याची सोय करून दिली जाते. असे कार्यकर्ते उमेदवाराशी एकनिष्ठ राहतील हे कशावरून सांगणार, असा सवालही एकाने केला. राजकारणाचे झालेले अधःपतन आमच्या विचारापलिकडील असल्याकडे एका बुजुर्गाने लक्ष वेधले.

आज स्वार्थासाठी एकमेकांच्या उरावर बसायला निघालेली ही मंडळी उद्या निवडणुकीनंतर तुझ्या गळा, माझ्या गळा करणार नाहीत, याची हमी कुणीच देऊ शकणार नसल्याने जनताही कोणत्याही उमेदवाराला फारसे मनावर घेत नाही, यावर सर्वच बुजुर्गांचे एकमत दिसून आले. राजकारणात सुरू असलेला खेळ पाहिल्यानंतर भावी पीढी यातून नेमका कोणता बोध घेणार, असा जळजळीत सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

-उदय भिसे । नागोठणे

First Published on: April 4, 2019 4:55 AM
Exit mobile version