घरताज्या घडामोडीLok Sabha 2024: ...तर पुन्हा लोकसभा लढवणार नाही; ऐन प्रचारात अजित पवार...

Lok Sabha 2024: …तर पुन्हा लोकसभा लढवणार नाही; ऐन प्रचारात अजित पवार असं का म्हणाले?

Subscribe

बारामती (पुणे ) – बारामती लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार गावागावात सभा, मिटींग घेत आहेत. अजित पवार प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क ठेवून आहेत. त्या तालुक्याचे प्रश्न कसे सोडवले जातील याचे आश्वासन देत आहेत. भोर तालुक्यात झालेल्या सभेत अजित पवार यांनी भोर-वेल्हेच्या विकासात मी कमी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, या तालुक्याला एमआयडीसीची आवश्यकता आहे. जर मी येथे एमआयडीसी आणू शकलो नाही तर पुढची निवडणूक लढणार नाही. माझा उमेदवार येथून देणार नाही, हा अजित पवारांचा तुम्हाला शब्द आहे, असे निकराचे आवाहन त्यांनी केले.

भोर-वेल्हे एमआयडीसीवरुन अजित पवार काय म्हणाले?

बारामतीमध्ये अजित पवार सर्वाधिक वेळ देत आहेत. प्रत्येक तालुक्यात त्यांचा दौरा सुरु आहे. भोर तालुक्यातील सभेत अजित पवारांच्या उपस्थितीत एका स्थानिकाने त्यांना प्रश्न केला की, दादा आम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान करु. निवडून देऊ. पण तुम्ही निवडून आल्यानंतर आमच्या भागात एमआयडीसी स्थापन केली नाही तर पुढच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला साथ देणार नाही. यावर अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले की, हे तुम्ही सांगण्याची गरजच नाही. मीच परत लोकसभेला उभा राहाणार नाही. जर मी तुमचे काम करु शकलो नाही तर माझेच मन मला खाईल आणि दिलेला शब्द मी पाळू शकलो नाही तर मीच पुन्हा निवडणूक लढवणार नाही. पण मी असं काहीही होऊ देणार नाही. भोर-वेल्हे भागासाठी एमआयडीसी आणणार हा अजित पवारांचा तुम्हाला शब्द आहे.

- Advertisement -

कामे करण्यासाठी दरारा लागतो

सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यावरुन टोला लगावताना अजित पवार म्हणाले की, नुसती संसदेत भाषणं करुन सर्वसामान्य लोकांची कामे होत नसतात. त्यासाठी माझ्यासारखं सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांच्या संपर्कात राहावे लागते. लोकांची कामे करावी लागतात. नाही तर मीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाषणे दिली असती. भाषणाला कामाचाही जोड द्यावी लागते, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता प्रतिस्पर्धी उमेदवार सुळे यांना लगावला.

प्रशासनाकडून कामे करुन घ्यावी लागतात. त्यासाठी खासदाराचा दरारा लागतो, मात्र आताच्या खासदाराचा तसा दराराच नाही, असेही अजित पवार म्हणाले. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहावे लागेल.

- Advertisement -

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -