महाड एमआयडीसीचा रस्ता खड्ड्यात!

महाड एमआयडीसीचा रस्ता खड्ड्यात!

येथील एमआयडीसीमधील रस्त्याला सध्या वाईट दिवस आले असून, पावसाळ्यापूर्वी योग्य दुरुस्ती न झाल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी वितभर खोली गाठली आहे. त्यामुळे अपघातांची टांगती तलवार वाहनचालकांच्या डोक्यांवर लटकत आहे.

ही एमआयडीसी बिरवाडी, नडगाव तर्फे बिरवाडी, आसनपोई, कांबळे तर्फे बिरवाडी, जिते, टेमघर या गावांलगत वसली आहे. बहुतांश रासायनिक कारखान्यांतून प्रतिदिन अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. शिवाय बिरवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या प्रवासाचा हाच मार्ग असल्याने तीन चाकी रिक्षा, मिनिडोर, एसटी बसेस, तसेच मालवाहू लहान वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. औद्योगिक क्षेत्रातील या गावांतील ग्रामस्थांना जाण्या-येण्यासाठी एमआयडीसीच्या मालकीचा रस्ता वापरावा लागतो. नांगलवाडीपासून आमशेत, बिरवाडी, जिते, टेमघर या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ऐन पावसाळ्यात खड्डे भरण्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले, मात्र ते पूर्ण झाले नाही. यामुळे मातीने भरलेले हे खड्डे अल्पावधीतच पुन्हा उघडे पडले.

नांगलवाडी ते बिरवाडी हा रस्ता एमआयडीसीच्या ताब्यात आहे. त्याची दुरुस्ती आणि देखभाल हे एमआयडीसीच्या बांधकाम विभागाकडून केली जाते. प्रतिवर्षी यावर खड्डे बुजविण्यासाठी खर्च केला जातो. दिवसागणीक वाढणार्‍या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती वाढत आहे. दरम्यान, एमआयडीसीमधील मार्ग अवजड वाहतूक पेलण्याच्या क्षमतेचा असावा, अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

First Published on: September 11, 2019 5:50 AM
Exit mobile version