चार दिवसांच्या मुदतीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान

चार दिवसांच्या मुदतीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, शैक्षणिक वर्षे २०२०-२१ या वर्षात जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) उत्तीर्ण झालेत, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुण मिळणार आहेत. मात्र, हे गुण बोर्डाला सादर करण्यासाठी फक्त चार दिवसांचा कालावधी मिळालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेता एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांचे गुण सादर करण्यासाठी मुदत वाढून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र्र राज्य शिक्षण परिषदेकडून करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचे सवलतीचे गुण देण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला होता. याबाबतचे पत्र २४ जून २०२१ रोजी काढण्यात आले होते. या पत्रानुसार विद्यार्थ्यांनी २८ जून २०२१ पर्यंत शाळांकडे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. वास्तविक बोर्डाने पत्र उशिरा काढले होते. त्यात अतिशय कमी मुदत म्हणजे फक्त ४ दिवसांचाच कालावधी दिला होता. परिपत्रक जारी केल्यानंतर विद्यार्थ्यांना माहीत होण्यातच वेळ गेला होता. तसेच शाळांनीही २९ जून ते २ जुलै या चार दिवसात सवलतीच्या गुणांबाबतचे प्रस्ताव बोर्डाकडे पाठवायचे होते. एकतर पत्रक उशिरा काढले. त्यात मुलांना गुण सादर करण्यासाठी पुरेशी मुदतही दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुनी प्रमाणपत्रे शोधून शाळेकडे सादर करण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. बहुतांश शाळासुद्धा ५ जूनपर्यंत निकाल बनवण्यासाठी व्यस्त होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शाळांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचे गुण बोर्डाकडे सादर करण्यासाठी अजून चार दिवसांची मुदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शाळांकडून होत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांचे गुण सादर करण्यासाठी बोर्डाने एक संधी द्यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.

First Published on: July 9, 2021 3:50 AM
Exit mobile version