सरकारी वकिलामार्फत भाजपला संपविण्याचे षड्यंत्र

सरकारी वकिलामार्फत भाजपला संपविण्याचे षड्यंत्र

भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना मोक्काच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी षड्यंत्र रचले. खोटे पुरावे तयार केले. इतकेच नाही तर त्यांच्या टार्गेटवर मी स्वतः, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपमधील इतर प्रमुख नेते होते, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

मी केवळ पोकळ आरोप करत नाही तर त्याचा पुरावा म्हणून माझ्याकडे सव्वाशे तासांच्या ऑडिओ-व्हिडिओ टेप्सही आहेत, असे सांगत त्यांनी त्या उपाध्यक्षांना सादर केल्या. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. देशाचा शत्रू असणार्‍या दाऊदच्या नातेवाईकांसोबत व्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षाच्यावतीने नियम २९३ अन्वये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा उपस्थित करण्यात आली. या चर्चेची सुरुवात करताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षड्यंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप त्यांनी पुराव्यांसह केला.

माजी मंत्री आणि भाजपचे जळगाव जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याची संपूर्ण स्क्रिप्ट सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी लिहिली होती. एफआयआरही त्यांनी लिहिला. साक्षीदारही त्यांनी उभे केले. रक्त लागलेला चाकूही त्यांनी तयार केला. आमच्या पक्षातील एक नेते जे सत्ताधारी पक्षात गेले त्यांनी त्यांना सर्व मदत केली. धाड टाकायला गेलेल्यांचे त्यांनी हॉटेल बुकिंगही करून दिले. याबाबतचे सर्व रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखच बरे होते. त्यांचे तर माझ्याशिवाय पानही हलायचे नाही. त्यांनी २५० कोटी रुपये तरी बदल्या आदी कामांत कमावले असतील. मुंबईत १०० बिल्डर आहेत, च्या प्रत्येकाकडून दोन तीन कोटी जरी जमविले तरी २०० कोटी सहज होतात. उपमुख्यमंत्री अजित पवार माझे ऐकत नाहीत. बडे साब सपोर्ट करतात, असे चव्हाण संभाषणात म्हणत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच महाजन यांनाही अडकविण्यासाठी चव्हाण यांनी पूर्ण प्रयत्न केले. त्यात पोलिसांचाही सहभाग दिसून येतो, असे फडणवीस म्हणाले. गिरीश महाजन यांच्यावर धाड घालायला मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या. सर्व पैसे खडसे साहेब देतील, असे चव्हाण म्हणतात. एकटे महाजनच नाही तर मी स्वतः, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे या भाजप नेत्यांनाही अडकविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते, असा दावा चव्हाण यांनी केल्याचाही फडणवीस म्हणाले. पोलिसांचाच यात सहभाग असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात आली पाहिजे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ. विरोधी पक्षाला जर अशा प्रकारे संपविण्याचा प्रयत्न सुरू असेल तर आरपारची लढाई लढण्याचीही आमची तयारी असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे
दाऊद इब्राहिम हा देशाचा शत्रू नंबर एक आहे. मुंबईचा तो गुन्हेगार आहे. त्याची दिवंगत बहीण हसीना पारकर आणि त्याचा भाऊ यांना पुढे करून तो मुंबईतले त्याचे रियल इस्टेटचे व्यवहार सांभाळायचा. याच हसीना पारकर सोबत मंत्री नवाब मलिक यांनी जमिनीचे व्यवहार केले आहेत. शहावली खान, सलीम पटेल हे बॉम्बस्फोटात शिक्षा सुनावण्यात आलेले गुन्हेगार हे हसीनाचे फ्रंटमॅन होते. यांच्यासोबत मलिक यांनी व्यवहार केले. कुर्ला एलबीएस रोडवरील अतिशय महागडी जमीन जिची किंमत दोन हजार रुपये चौरस फुट होती ती २५ रुपये भावाने खरेदी केली. मुंबईत उकीरड्याची जागा तरी २५ रुपयाने मिळते का, असा सवाल फडणवीस यांनी केला.

त्यामुळे मलिक यांना मंत्रिपदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. मलिक यांचा राजीनामा तत्काळ घेतला गेला पाहिजे. केवळ विरोधी पक्ष राजीनामा मागतो म्हणून घ्यायचा नाही असा हा प्रकार नाही. मी विरोधी पक्षनेता झाल्यापासून आतापर्यंत एकाही मंत्र्याचा किंवा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा कधीच मागितलेला नाही. हा मुंबईच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी राजीनामा हवा आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्या दाव्यानुसार स्टिंग ऑपरेशनमधील माहिती
पवार साहेबांना कसे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांना संपवायचे आहे, त्यासाठी कोणते निर्देश त्यांना प्राप्त झाले आहेत, हे सर्व करण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आले. त्यासाठी त्यांनी कशी कबुली दिली, याचा संपूर्ण तपशील प्रवीण चव्हाण यांनी कथन केला आहे. मीडियाला कोणत्या बातम्या लीक करायच्या, आधीच ठेवलेल्या पुराव्यांचे चित्रीकरण कसे करायला लावायचे, याचेही तपशील त्यात आहेत. पुरावे प्लांट करताना कुठेही कॅमेरे नाहीत, यासाठी आधीच रेकी कशी करण्यात आली, याचीही कबुली चव्हाण देत आहेत. अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवादही आहे, फोन कॉल्स आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या भेटी-बैठकी याचे इत्थंभूत तपशील त्यात आहेत. साहेब कसे कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत आणि उगाच पोलीस स्टेशन डायरीत नोंद नको, म्हणून पडद्याआडून काय-काय निर्देश देतात, याची संपूर्ण कथा चव्हाण यांनी सांगितल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांना स्टोरी कशी बनवायची हे ठावूक – नाना पटोले
फडणवीस यांनी जे काही व्हिडिओ विधानसभा अध्यक्षांना दिले, त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे. शिवाय घरचे सीसीटीव्ही फुटेज कसे बाहेर आले? हे देखील तपासले पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

सभागृहातच या विषयावर भूमिका मांडेल – दिलीप वळसे पाटील
विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा पोलीस आणि सरकारी वकिलांनी कट रचल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी अध्यक्षांना दिलेल्या पेन ड्राईव्हमधील व्हिडिओ मी बघितलेले नाहीत. ते बघितल्यानंतरच मी सभागृहात यासंदर्भातील माझी भूमिका मांडेन, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

First Published on: March 9, 2022 6:30 AM
Exit mobile version