यंदाचा अर्थसंकल्प गरिबांना आधार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा – एकनाथ शिंदे

यंदाचा अर्थसंकल्प गरिबांना आधार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा – एकनाथ शिंदे

‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प गरिबांना आधार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. पायाभूत सुविधा आणि उद्योगांना उभारी व उत्तेजन देणारा आहे. सर्वासमावेश असलेल्या हा अर्थसंकल्प आहे’, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील पाचवं आणि शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर कौतुक केले जात आहे. (Maharashtra CM Eknath Shinde Talk On Union Budget 2023-24)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24चे कौतुक केले. “यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प गरिबांना आधार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. पायाभूत सुविधा आणि उद्योगांना उभारी व उत्तेजन देणारा आहे. सर्वासमावेश असलेल्या हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये रोजगार निर्मिती, शेतकरी, आरोग्य, कामगार, महिला, युवक आणि आदिवाशी विभाग या सर्वांनाच दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“खरं म्हणजे सहकार क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. त्यावेळी साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र अडचणीत आले होते. त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या काळात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजच्या अर्थसंकल्पात 10 हजार कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“आजच्या अर्थसंकल्पात सप्तर्षी कार्यक्रमाला मान्यता दिली. सप्तर्षी कार्यक्रम म्हणजे सर्वसमावेशक विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीला प्राधान्य, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक कल्याण आणि आर्थिक क्षेत्राचा विकास असे सात विकास एकत्र करून एक सप्तर्षी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशाची आर्थिक उन्नती आणि देशाचा आर्थिक सर्वांगिण विकास आणि राज्यालाही या तरतूदीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच, शहर विकास, नागरी विकासासाठी ही मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमुळे संबंधित देशाची आणि राज्याची प्रगती वेगाने होत असते”, असेही शिंदे म्हणाले.

“या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा देण्यासाठी योजना आणण्यात आल्या आहेत. तसेच, या देशात असणाऱ्या घटकांना भक्कम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळेच हा अर्थसंकल्प देशाला आणि राज्याला चालना देणारा आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा – Union Budget 2023 : संरक्षण क्षेत्रासाठी 5.94 लाख कोटी रुपयांची तरतूद; 12.95 टक्के वाढ

First Published on: February 1, 2023 5:48 PM
Exit mobile version