महाराष्ट्रात किमान ७ दिवस Lockdown ? संसर्गाचे राजकारण नको- मुख्यमंत्री

महाराष्ट्रात किमान ७ दिवस Lockdown ? संसर्गाचे राजकारण नको- मुख्यमंत्री

मला कुणाचीही रोजीरोटी हिरवून घ्यायची नाही, पण जिवांची काळजी घ्यावीच लागणार विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाऊन करणे आवडत नाही, पण लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नसून तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन सरकार करत असलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी, त्यामध्ये राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्रांचे संपादक, मालक आणि वितरक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्यसचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरूद्ध अष्टपुत्रे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संसर्ग रोखण्यासाठी काही पर्याय आहेत, हे तज्ञांकडून जाणून घेतले. या चर्चेमध्ये लॉकडाऊनशिवाय इतर काही पर्याय आहेत का ? याबाबत आलेल्या सूचनांवर सुमारे दीड तास चर्चा केली.

कसे आहात लॉकडाऊनचे पर्याय ?

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून रूग्णसंख्या अशीच वाढली, तर उपलब्ध असलेला ऑक्सिजनही पुरणार नाही अशी भीती व्यक्त केली. सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना काळात औद्योगिक विभागासाठी २० टक्के आणि सार्वजनिक आरोग्यासाठी ८० टक्के दिला जातो. मागील १५ दिवसात वाढणारे कोरोना रूग्ण पाहता आता तो १०० टक्के सार्वजनिक आरोग्यासाठी वापर केला जाईल, असे संकेतही या अधिकाऱ्यांनी दिले.

पर्याय १: कोरोनाची साखळी तोडण्यास ७ दिवसांचा लॉकडाऊन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवार, शनिवार, रविवार, प्रशासनातील अधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रसारमाध्यमांचे वरिष्ठ प्रतिनिधी, जीम मालक, मल्टीप्लेक्स, थिएटर ओनर्स, रिटेल व्यापारी असोसिएशन आणि सर्वच राजकीय पक्षांच मत जाणून घेणार आहेत. यासर्वांशी बोलल्यानंतर आणि सूचना एकल्यानंतरच राज्यात किमान सात दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘आपल महानगर’ शी बोलताना व्यक्त केली. लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय राज्यासमोर दिसत नाही आणि कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी किमान सात दिवस तरी लॉकडाऊन लावला जाईल, असे संकेत या अधिकाऱ्याने दिले. मात्र याबाबतची अधिकृत भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जाहीर करतील. राज्यापुढे सध्या तीन पर्याय असून त्यामध्ये किमान सात दिवस लॉकडाऊन पर्याय आहे.

पर्याय २ : राज्यात मिनी लॉकडाऊन

दुसरा पर्याय म्हणजे पुण्याप्रमाणे मिनी लॉकडाऊन काही ठराविक तासांचा (सायंकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान) हे दोनच पर्याय सध्या तरी दिसत आहेत. शनिवारी राज्यात ४९ हजार ७७७ इतके नवे रूग्ण दाखल झाल्याने राज्यसरकारपुढचे कोरोनाचे संकट वाढलेले आहे.

तिसरा पर्याय : सेवा सुविधांवर कडक निर्बंध 

जिम, व्यायामशाळा, मॉल, पब, बार, थिएटर, धार्मिक स्थळ आणि आठवडी बाजार हे पुर्णपणे बंद करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते पाळल्याने ही साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

राजकारण करू नका – मुख्यमंत्री 

सरकारला लॉकडाऊन करणे ही गोष्ट आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको, तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊत यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्या कामी माध्यमांनीही सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आज आपण ऑक्सिजन उत्पादन कसे वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र –करार स्वरूपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई आयसीयुचा उपयोग कसा करता येईल तेही पाहतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पहावा व वस्तुस्थिती मांडावी, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


 

First Published on: April 3, 2021 8:41 PM
Exit mobile version