Corona Vaccination: महाराष्ट्राने १० कोटींचा लसीकरणाचा टप्पा केला पार

Corona Vaccination: महाराष्ट्राने १० कोटींचा लसीकरणाचा टप्पा केला पार

कोरोना महामारीच्या लढाईत सर्वात महत्त्वाचे अस्त्र कोरोना प्रतिबंधात्मक लस आहे. त्यामुळे कोरोना लढाईत जिंकण्यासाठी देशभरात वेगाने लसीकरण सुरू आहे. २१ ऑक्टोबर २०२१ हा भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस होता. या दिवशी देशात लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. या लसीकरणात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाचे असल्याचे अनेक महाविकास आघाडीमधील नेते म्हणाले होते. आज महाराष्ट्राने १० कोटींचा लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करते सर्वांचे अभिनंदन केले आहे. १० कोटींचा टप्पा गाठणार महाराष्ट्र देशातील दुसर राज्य आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश राज्याने लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा पार केला होता.

राजेश टोपे ट्वीट करून म्हणाले की, ‘महाराष्ट्राने आज १० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो.’

माहितीनुसार, आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ४ लाख ७ हजार ८७५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. आतापर्यंत ६ कोटी ८० लाख २८ हजार १६४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ३ कोटी २० लाख ३७ हजार ७३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत १० कोटी ६५ हजार २३७ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली गेली आहे.

आज दुपारी ४ वाजता महाराष्ट्राने १०० मिलियन म्हणजेच १० कोटींचा लसीकरणाचा टप्पा ओलांडला. सर्व जिल्हाधिकाऱ्यांमुळे हे शक्य झाले. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या, असे ट्वीट संजय जोग यांनी केले आहे.

दरम्यान आज दिवसभरात महाराष्ट्रात ९८२ नवे कोरोनाबाधित आढळले असून २७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख १९ हजार ३२९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४० हजार ४३० जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ६१ हजार ९५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात १३ हजार ३११ सक्रीय रुग्ण आहेत.


हेही वाचा – थोडं धैर्य ठेवा, तुम्ही लढा, सत्याचाच विजय होणार; राज्यपालांचं वानखेडे कुटुंबियांना आश्वासन


 

First Published on: November 9, 2021 7:22 PM
Exit mobile version