Winter session 2021 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?

Winter session 2021 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. अधिवेशन येत्या डिसेंबर अखेरीस अथवा जानेवारी होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरवले जाऊ शकते.

जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ मध्ये नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, नियोजित अधिवेशनाला २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्याप मंत्रालय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीची हालचाल नाही. साधारणतः विधिमंडळ अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते. या बैठकीत अधिवेशनाचे प्राथमिक कामकाज निश्चित केले जाते.  अधिवेशनाला जेमतेम २५ दिवस शिल्लक असताना सल्लागार समितीच्या  बैठकीबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून विधानमंडळ सचिवालयाला अजून पत्र देण्यात आले नाही. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. नागपूर अधिवेशनात मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, पोलीस असे मिळून जवळपास १० ते १५ हजार जणांचा लवाजमा जमतो.  कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने  राज्य सरकार  नागपूर अधिवेशनाबाबत धोका पत्करण्यास तयार नाही. परिणामी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होण्याची शक्यता आहे.  विधानमंडळ सचिवालयाने मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी अधिवेशन घेण्याची तयारी ठेवली आहे.

अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला मतदान आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. शिवाय शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  विश्रांती घेणार आहेत.त्यामुळे अधिवेशन एकदोनआठवडे पुढे ढकलले जाऊ शकते.

‘ राज्य घटनेच्या कलम १७४ नुसार विधिमंडळाच्या दोन अधिवेशनाच्या दरम्यान सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. तसेच वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होते. जर हिवाळी अधिवेशन जानेवारीत झाले तर सरकारला अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण घ्यावे लागेल’

डॉ. अनंत कळसे
माजी प्रधान सचिव
महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय


 

First Published on: November 12, 2021 6:16 PM
Exit mobile version