समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता ‘कृष्णकुंज’

समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता ‘कृष्णकुंज’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे सर्व उद्योगधंदे, नाट्यगृह, ग्रंथालये आदी बंद करण्यात आले होते. मात्र, राज्यत अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हळूहळू सर्व सुरु करण्यात आले. पण काही व्यवसाय अद्याप सुरु करण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून अनेक संघटना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर जाऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते. यावर राज ठाकरे यांनी पुढाकर घेत, अनेकांच्या अडचणी सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले. डबेवाले, कोळी बांधव, जिम मालक, पुजारी, बॅण्ड पथक यांसह इतर अनेक संघटनांनी आतापर्यंत राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत कृष्णकुंज हा मंत्रालयाचा नवीन पत्ता असल्याचे म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

“समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28”, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

आतापर्यंत बेस्ट कर्मचारी, केबलचालक, कोळी बांधव, मूर्तीकार, डबेवाले, जिम चालक-मालक, कोळी महिला, वीजबिल ग्राहक, पुजारी, डाॅक्टर, पालक-विद्यार्थी, कोचिंग क्लासेस शिक्षक, ग्रंथालय चालवणारे आदिंच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. तर नुकतीच यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी वारकरी संप्रदाय तसेच आपली विविध कामे सुरू करण्यासाठी बॅण्ड पथकांनी त्यांची भेट घेत आपली भूमिका मांडली होती.

 

First Published on: November 16, 2020 1:48 PM
Exit mobile version