मी सध्या बेरोजगार, मोदींनी ठरवलं तरी…; पंकजा मुंडेंनी भाजप नेत्यांनाच शालजोडीत लगावल्या

मी सध्या बेरोजगार, मोदींनी ठरवलं तरी…; पंकजा मुंडेंनी भाजप नेत्यांनाच शालजोडीत लगावल्या

सध्या मी बेरोजगार असल्याचे म्हणत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप नेत्यांनाच शालजोडीत लगावल्या आहेत. बीडच्या परळीत संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा महोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी सभेला संबोधित करताना भाजपसह विरोधकांवर कडकडून टीका केली आहे. यात अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरी ते मला संपवू शकणार नाहीत, असं वक्तव्य केल्याने पंकजा मुंडे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, तर ताईंना सांग मला काही तरी काम द्या, याचा मला खूप आनंद झाला. कारण मी जर कोणाला काम देऊ शकत असेन, तर मलाही काम मिळेल, सध्या मीच बेरोजगार आहे, मला तुमची प्रार्थना आवडली, एक तीर मे दो शिकार, असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे.

यावेळी पंकजा मुंडेंनी वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या सोशल मीडिया ट्रोलिंगवरही भाष्य केले. पंकजा म्हणाल्या की, मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. जुन्या काळातील युद्ध वेगळं होतं. नव्या काळातील युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे. हे युद्ध सोशल मीडिया वर लढले जाते. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावडा निमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद” या कार्यक्रम आयोजित केला होता. यात पंकजा मुंडे यांनी प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरु असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे असल्याचे म्हटले. यावेळी पंकजा मुंडेंनी थोडा ब्रेक घेत यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे पण मला मोदीजीही संपवू शकत नाही, असं विधान केले ज्यावरून उपस्थितांनीही आश्चर्य व्यक्त केले. यावरून आता पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगतेय.


दसऱ्याच्या दिवशीही राणीची बाग व संग्रहालय पर्यटकांसाठी खुले

First Published on: September 29, 2022 8:00 PM
Exit mobile version