Maharashtra politics : संजय राऊत बरोबर बोलले…, मोहित कम्बोज यांचा ठाकरेंवर निशाणा

Maharashtra politics : संजय राऊत बरोबर बोलले…, मोहित कम्बोज यांचा ठाकरेंवर निशाणा

Maharashtra politics : Sanjay Raut rightly said..., Mohit Kamboj's target on Thackeray

मुंबई : मुख्यमंत्रीपदावर आत्ताच क्लेम करायला तयार असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केले. यावरून सर्वत्र विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता असल्याचे सांगत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. हाच धागा पकडून भाजपा नेते मोहित कम्बोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही लागू शकतो. अशातच शिंदे गटाबरोबरच महाविकास आघाडीतील ठाकरे गटात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे मधल्या काळात नॉट-रिचेबल झाल्याने त्यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा रंगायला लागली. अखेर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन, या नुसत्या वावड्या आहेत. मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

पण नंतर अजित पवार यांना एका कार्यक्रमात, आता 2024ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर क्लेम 2024ला का? आताच करणार, असे सूचक विधान अजित पवारांनी केले. त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी प्रतिक्रिया देताना, अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून, तोडफोड करून मुख्यमंत्री होत असतात. एखाद्याच्या भाग्यात लिहिले असेल तर, ते मुख्यमंत्री होतात. अजितदादांची इच्छा आहे आणि त्यांनी ती पहिल्यांदा व्यक्त केलेली नाही. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

त्यावर संजय राऊत यांच्या याच विधानासंदर्भात मोहित कम्बोज यांनी ट्वीट केले आहे. उद्धव ठाकरेंबद्दल संजय राऊत जे बोलले, ते अगदी बरोबर आहे. ते कोणत्याही पात्रतेशिवाय, तोडफोड करून मुख्यमंत्री झाले, असल्याची टीका त्यांनी केली आहे.

First Published on: April 22, 2023 6:07 PM
Exit mobile version