न्यायालयात व्हायचे ते होईल, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, जनता गद्दारांना धडा शिकवेल : उद्धव ठाकरे

न्यायालयात व्हायचे ते होईल, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, जनता गद्दारांना धडा शिकवेल : उद्धव ठाकरे

शिवसेनेत फूट पडली आणि महाराष्ट्रात राजकीय संकट ओढावले. सत्तेचा हा पेचप्रसंग थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवणे, खरी शिवसेना कोणाची, तसेच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत अशा मुद्दांवर सुनावणी होणार आहे. यासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “न्यायालयात व्हायचे ते होईल, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, जनता गद्दारांना धडा शिकवेल”, असे म्हटले. त्यामुळे आता या सुनावणीदरम्यान निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे महाराष्ट्रासह देशभराचे लक्ष लागले आहे. (Maharashtra politics supreme court i have faith in the judiciary says shiv sena chief uddhav thackeray)

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी “जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. जनता गद्दारांना धडा शिकवेल. यांच्याकडे सगळेच पैशांनी काम होते. माझ्याकडे माझी रक्तामांसाची, जिवाला जीव देणारी माणसे आहेत. तुम्ही सदस्यपत्र घेऊन आलेला आहात तो मी पहिला टप्पा मानतो. न्यायालयात काय व्हायचे ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. निवडणुका कधी एक येतात आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवतो. पण निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत आहे, असं मला वाटत नाही”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबतचा फैसला उद्याच्या सुनावणीत होणार आहे. या प्रकरणी 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून 12 ऑगस्ट करण्यात आली. त्यानंतर ही तारीख पुन्हा बदलून 22 ऑगस्ट केली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोटी फूट पडली आहे. बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात समावेश केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले.


हेही वाचा – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल

First Published on: August 21, 2022 4:13 PM
Exit mobile version