प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांताकडे पैशांची मागणी कुणी केली?

प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांताकडे पैशांची मागणी कुणी केली?

महाराष्ट्र औद्योगिकीकरणातील देशातील अग्रेसर राज्य आहे. देशात बाहेरून कुठलाही प्रकल्प आला, तर महाराष्ट्रालाच त्याचे पहिले प्राधान्य असायचे. असे असताना आता पूर्वीसारखे प्रकल्प राज्यात का येत नाहीत? आलेले उद्योगही आपण हातचे घालवतोय यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणे हे राज्य सरकारचे अपयश आहे. उद्योग क्षेत्राकडे महाराष्ट्राचे लक्ष नाही. हा प्रकल्प गुजरातला का गेला, या उद्योजकांकडे कोणी पैसे मागितले होते का, असे प्रश्न उपस्थित करीत याबाबतची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते सोमवारी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

विदर्भाच्या दौर्‍यावर असलेले राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून शिंदे सरकार आणि तत्कालीन मविआ सरकारमधील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले की, औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने जेवढे लक्ष द्यायला पाहिजे तेवढे दिले जात नाही. महाराष्ट्रात आधीच अनेक उद्योग आल्यामुळे आता उद्योग गेले तर काय फरक पडतो असे आता राज्यकर्त्यांना वाटते. येणार्‍या उद्योगांसाठी पैसे मागणार असू तर महाराष्ट्रात कोण आणि का येईल? उद्योगांमुळे रोजगार निर्मिती होते. त्यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणे चांगले नाही. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणात नेमके फिस्कटले कुठे याची चौकशी व्हायला हवी. या उद्योगांसाठी पैसे मागितले का याचीही चौकशी व्हावी.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यूचा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता. या प्रकल्पासाठी मंत्रालयात बैठक ठरली, परंतु काहीतरी कारणांनी विलासराव निघून गेले. तिथे उपस्थित असलेल्या मंत्रालयातील इतर अधिकार्‍यांनी बैठक घेतली. यावेळी बीएमडब्ल्यू प्रकल्पाचे इतर अधिकारीही उपस्थित होते. ते अधिकारी दाक्षिणात्य होते. उद्योग राज्यात येतो तेव्हा काही पायभूत सुविधा तिथे लागतात, मात्र त्या सुविधांसाठीच मंत्रालयातील अधिकार्‍यांनी नानाचा पाढा लावला. जमीन हस्तांतरण जलद गतीने होणार नाही, विजेचा प्रश्न आहे, पाणी नाही, असे सर्व निगेटिव्ह रिमार्क द्यायला सुरुवात केली. बैठक संपली तेव्हा लागलीच तामिळनाडूच्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि हा कारखाना तामिळनाडूमध्ये गेला, असे उदाहरणही राज ठाकरेंनी दिले.

मतदारांची प्रतारणा सुरू
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत मतदारांशी जी प्रतारणा सुरू आहे ते अभूतपूर्व आहे. निवडणुकीत ज्या युत्या आणि आघाड्या होतात त्या निवडणुकीनंतर सोयीस्कररित्या तोडल्या जाताात. कशासाठी तर सत्तेच्या स्वार्थासाठी. मतदार दोन-दोन तास उभे राहून मतदान करतात. त्यानंतर निकाल लागतो तेव्हा कोणी सकाळी जाऊन राज्यपालांकडे शपथविधी करतो. मग भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतात. दोन तासांमध्ये फिस्कटते. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतात. मला ही गोष्ट कळलेलीच नाही. महाराष्ट्रातील जनतेला आपण गृहीत धरू शकतो याची खात्री पटल्यामुळेच हे सुरू आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त
आज पक्षाला १६ वर्षं झाली. मात्र या काळात मला नागपूरमध्ये जसा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नाही. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरमध्ये पक्ष वाढलेला नाही. नागपूरमध्ये अनेक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना संधी देणे गरजेचे आहे, असे मला वाटते, असे म्हणत राज ठाकरे यांनी नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील सर्व पदं बरखास्त केली. २६ आणि २७ तारखेला घटस्थापना होईल, तेव्हा मी नवी कार्यकारिणी जाहीर करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: September 20, 2022 5:00 AM
Exit mobile version