कोरोनाकाळात मंत्र्यांवर पंचतारांकित उपचार

कोरोनाकाळात मंत्र्यांवर पंचतारांकित उपचार

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराची लाखो रुपयांच्या बिलाची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाच्या काळात मंत्र्यांनी जनतेचा पैसा वापरून पंचतारांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे.

कोरोनाकाळात सरकारी रुग्णालयातील दुरवस्था आणि खासगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा बिलांत जनता भरडली असताना सरकारमधील १८ मंत्र्यांनी मात्र खासगी रुग्णालयातच सर्वाधिक उपचार घेतले. या २ वर्षांत १८ मंत्र्यांच्या खासगी रुग्णालयातील उपचारांची १ कोटी ३९ लाख २६,७२०रुपयांची बिले सरकारी तिजोरीतून देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करण्याचे टाळत खासगी रुग्णालयात केलेल्या उपचारांचे बिल ३४ लाख ४० हजार ९३० रुपये इतके झाले आहे. या यादीत राजेश टोपे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे खासगी रुग्णालयातील उपचारांचे बिल १७ लाख रुपये, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे १४ लाख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार १२ लाख, जितेंद्र आव्हाड ११ लाख, छगन भुजबळ ९ लाख, सुनील केदार ८ लाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील ७ लाख, सुभाष देसाई ७ लाख, अनिल परब यांच्या ६ लाख ७९ हजारांची बिले राज्य सरकारच्या तिजोरीतून भरण्यात आली आहेत.

सन २०२० ते २०२२ या वर्षांत मंत्र्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या २९ बिलांची प्रतिपूर्ती सरकारी तिजोरीतून झाली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी, लीलावती व बॉम्बे रुग्णालयातील सर्वाधिक बिले आहेत. त्यामुळे स्वत:वर उपचारांसाठी मंत्र्यांचे सरकारीपेक्षा प्राधान्य खासगी रुग्णालयांनाच असल्याचे स्पष्ट होते.

हीच का तुमची शिवशाही?
कोरोनाच्या काळात सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळवण्यासाठी धडपडणार्‍या जनतेच्या निमित्ताने भाजपचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काही प्रश्न केले आहेत. ते म्हणाले की, जनतेला सरकारी हॉस्पिटलसाठीही रखडावे लागत होते त्या कोरोनाकाळात काळात मंत्री जनतेचा पैसा वापरून पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी! हीच का तुमची शिवशाही? असाही सवाल भातखळकर यांनी केला आहे.

First Published on: April 22, 2022 5:46 AM
Exit mobile version