मुंबई, नागपूरमध्ये ईडीची मोठी कारवाई; ट्वीट करत दिली माहिती

मुंबई, नागपूरमध्ये ईडीची मोठी कारवाई; ट्वीट करत दिली माहिती

अंमलबाजवणी संचालनालय म्हणजेच ईडीने राज्यात १५ ठिकाणी छापेमारी केली आहे. राज्यातील मुंबई आणि नागपूर येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये ईडीकडून कोटिस रुपये तसेच बेहिशेबी दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. तसेच ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे, त्याबाबतचा अधिक तपास करण्यात येत आहे.

ईडीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडून नागपूर आणि मुंबईच्या काही भागात छापेमारी करण्यात आली. नागपूरमध्ये ईडीने स्टील, लोह आणि रिअल इस्टेटीचे व्यावसायिक असणाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली. या छापेमारीमध्ये ईडीने तब्बल ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच ज्याठिकाणी छापे टाकण्यात आले त्याठिकाणी काही महत्वाची कागदपत्रे सुद्धा सापडली आहेत. ज्याचा ईडीकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, ईडीने अनेक लोकांची फसवणूक करणारा पंकज मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन यांच्या घरावर हा छापा टाकला. पंकज मेहाडिया याच्यावर अनेक व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून पंकज मेहाडिया आणि त्याच्या साथीदारांवर याआधीच फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्या प्रकरणी त्याला २०२१ मध्ये तुरुंगात सुद्धा पाठ्वण्यातड आले होते. परंतु आता त्याच्या नागपूर येथील रामदासपेठ या परिसरातील घरावर ईडीने रविवारी (ता. ०५ मार्च) छापा टाकला. ईडीने केलेल्या या छापेमारीमुळे नागपुरातील अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा – राष्ट्रीय राजकारण आणि उद्धव ठाकरेंबाबत संजय राऊतांनी केले मोठे विधान…

गेल्या काही महिन्यात ईडीकडून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. मुख्यत्वे करून ईडीच्या रडारवर राजकारणी असल्याचे पाहायला मिळत आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्यास गैरव्यवहार कायद्याअंतर्गत ईडीकडून कारवाई करण्यात येते. आतापर्यंत ईडीने अनेक राजकीय नेत्यांची आठ ते नऊ तास देखील चौकशी केलेली आहे. तर ईडीचा केंद्रीय सरकारकडून म्हणजेच भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आलेला आहे.

First Published on: March 6, 2023 8:26 PM
Exit mobile version