दिवाळी फराळ पुण्यातून परदेशात; ‘जीपीओ’त बुकींगसाठी नागरिकांच्या रांगा

दिवाळी फराळ पुण्यातून परदेशात; ‘जीपीओ’त बुकींगसाठी नागरिकांच्या रांगा

दिवाळीचा फराळ परदेशात पाठविण्यासाठीची व्यवस्था टपाल विभागाच्या जनरल पोस्ट ऑफीस (जीपीओ) येथे सुरू झाली आहे. दोन किलो पासून वीस किलो पर्यंत फराळ पाठविता येऊ शकणार आहे. त्यासाठी पार्सल बुकींगची व्यवस्थाही स्वतंत्र काऊंटरद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी इंटरनॅशनल स्पीड पार्सल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील टपाल विभागाने केले आहे.

जीपीओमध्ये स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था

दरवर्षी दिवाळी फराळाची पार्सल पुणेकर परदेशात स्थायिक झालेल्या त्यांच्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींस तसेच व्यावसायातील आणि कंपनीतील सहकार्यांना पाठवित असतात. त्याचप्रमाणे आता इंटरनॅशनल पार्सलसाठी बुकींग देखील सुरू झाले असून, नागरिकांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रामुख्याने रशिया आणि अमेरिकेत दिवाळी फराळाच्या पार्सलची संख्या अधिक आहे. त्यासोबतच फिलिपिन्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, कॅनडा, चीन, आयर्लंड यासारख्या देशांतही पुण्यातून दिवाळी फराळाची पार्सल्स् पाठविण्यात येत आहेत. दररोज साधारणतः सहाशे किलो फराळाची पार्सल पॅकबंद करून परदेशात पाठविण्यात येऊ लागली आहेत. त्यासाठी जीपीओतर्फे दोन मेलमोटारची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेलमोटारींव्दारे ही पार्सल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचविण्यात येतात. अवघ्या तीन ते पाच दिवसांमध्ये इंग्लड, अमेरिका, रशिया सारख्या विविध देशांमध्ये फराळाची पार्सल्स् रवाना होऊ लागली आहेत.

टपाल विभागाने दिवाळी फराळासोबतच भेटवस्तू तसेच कापडी पोषाख पाठविण्याची देखील आंतरराष्ट्रीय स्पीड पार्सलव्दारे सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र काऊंडर देखील सुरु केले आहे. पुणेकरांचे अनेक नातेवाईक, मुले-मुली, मित्र-मैत्रिणी परदेशात आहेत. कोणी शिक्षणासाठी तर कोणी व्यावसायानिमित्त गेले असून, काहीजण तेथे स्थायिकही झाले आहेत. त्यांना देखील दिवाळीच्या फराळांचा आस्वाद घेता यावा. यासाठी टपाल विभागाने नागरिकांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. – एन.आर.शेडगे; जीपीओचे वरीष्ठ पोस्ट मास्तर

आंतरराष्ट्रीय स्पीड पार्सलव्दारे पाठवा फराळ

नागरिकांच्या समोरच फराळाच्या पदार्थांसहीत अन्य वस्तूंचेही पॅकींग करण्यात येते. पार्सल पँकींगसाठी ५५ ते १५० रुपयांपर्यंतचे शुल्क आहे. दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर आली आहे. त्यामुळे जीपीओमध्ये दिवसाला शंभर ते सव्वाशे बुकींग होऊ लागली आहेत. वर्षभर ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, दिवाळीमध्ये फराळ पाठविण्यासाठी नागरिक पार्सल सेवेचा आवर्जून वापर अधिक प्रमाणात करतात. अनेकांची मुले-मुली परदेशात शिक्षणासाठी गेली आहेत. त्यांच्यासाठी देखील नागरिक वर्षभर विविध खाद्यपदार्थ्यांची पार्सल पाठवित असतात, अशी माहिती शेडगे यांनी दिली आहे.


हेही वाचा – पोस्टाचे आता व्हर्च्युअल कार्ड


 

First Published on: October 14, 2019 9:07 PM
Exit mobile version