आता समाज नव्हे आमदार, खासदारच बोलतील

आता समाज नव्हे आमदार, खासदारच बोलतील

Maratha Protestor

मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील, असे म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँग मार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मूक आंदोलन छेडत असल्याची माहिती दिली. १६ जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापूरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरू होईल. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, आतापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचे. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढणार असल्याचा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही पक्षासाठी नाही तर समाजासाठी आक्रमक भूमिका घेत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आता आक्रमक झालो आहोत, असेही ते म्हणाले.

संभाजीराजेंनी राजकारण्यांवरही घणाघाती टीका केली आहे. आपली व्होट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाही. पण मला ती काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. आता आपण डोकं लावून भूमिका घ्यायची असंही ते म्हणाले.

First Published on: June 10, 2021 11:54 PM
Exit mobile version