अनिल देसाईंनी दिला सत्तासंघर्षाच्या निकालाचा अंदाज; वर्तवली ‘ही’ शक्यता

अनिल देसाईंनी दिला सत्तासंघर्षाच्या निकालाचा अंदाज; वर्तवली ‘ही’ शक्यता

Anil Desai

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असल्याची शक्यता ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी गुरुवारी व्यक्त केली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज पूर्ण होईल. त्यानंतर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील अनिषेक मनू सिंघवी व देवदत्त कामत युक्तिवाद करतील. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु होईल. शिंदे गटाचा युक्तिवाद लवकर पूर्ण झाला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात निकाल यायला हवा, असे खासदार देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीसंदर्भात खासदार देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी न्यायालयाने १२ जुलै २०२२ पर्यंतची मुदत दिली होती. त्यांनी त्यानुसार उत्तर देणे अपेक्षित होते. त्यांनी उत्तर दिले नाही. नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. त्यांनतर तो विषय मागे पडला. आता सर्व गोष्टी पुढे गेल्या आहेत. त्यामुळे नव्याने विधानसभा अध्यक्षांसमोर १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय पाठवावा की सभागृहातील वरीष्ठ सदस्याने याची प्रक्रिया करावी अथवा न्यायालयाने स्वतः याची चाचणी करावी, असे पर्याय सध्या आहेत. न्यायालयाने यावर योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. कारण भारताच्या लोकशाहीतील हा सर्वात मोठा पेच आहे, असे खासदार देसाई यांनी सांगितले.

राजकीय पक्ष हा विधिमंडळातील सदस्यांपेक्षा मोठाच असतो. राजकीय पक्ष प्रमुखाशी चर्चा केल्यानंतर सर्व गोष्टी ठरतात. परस्पर सदस्य गोष्टी ठरवत नाहीत, हा ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद न्यायालयाने बुधवारी मान्य केला आहे, असेही खासदार देसाई यांनी स्पष्ट केले.

खासदार देसाई पुढे म्हणाले, समता पार्टी मशाल चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यांना कोण खतपाणी घालत आहे. त्यांच्या मागे कोणती महाशक्ती आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आता ज्या गोष्टी घडत आहेत त्या आमच्यासाठीही अनपेक्षित आहेत. पुढे काय करावे, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. कारण निवडणूक आयोगाने समता पार्टीचे मशाल चिन्ह रद्द केले होते. त्याची कागदपत्रे आहेत. संपूर्ण विचार करुन निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह आम्हाला दिले. असे असताना पुन्हा त्यावर दावा करणे हे कितपत योग्य आहे याचा विचार निवडणूक आयोग व न्यायालयाने करायला हवा. तसेच या सर्व गोष्टींचा लोकांनी विचार करायला हवा. कारण शेवटी जनता मतपेटीतून आपला कौल देत असते.

 

 

 

First Published on: February 23, 2023 11:02 AM
Exit mobile version