वधूपित्याची ताठर भूमिका; २०० रुपयांसाठी मोडले लग्न

वधूपित्याची ताठर भूमिका; २०० रुपयांसाठी मोडले लग्न

फक्त २०० रुपयांसाठी लग्न मोडल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडला आहे. लग्न झाल्यानंतर वर-वधू जेवायला बसल्यावर वराच्या ताटात २०० रुपयांचे वटकण लावल्याबद्दल वर आणि वराकडील मंडळी रुसून बसली. ते अधिक पैशाची मागणी करू लागले. त्यामुळे वधूपित्याचा संतापाचा पारा चढला. आताच ही मंडळी जास्त पैशाची मागणी करत आहेत. ती पैशावरून आपल्या मुलीचा छळ करतील, अशी शंका वधूपित्याच्या मनात निर्माण होऊन त्यांनी थेट वधूला वरासोबत न पाठवण्याचा निर्णय घेतला आणि लग्न मोडले. त्यामुळे वराकडील मंडळींना हात हलवत मांडवातून निघावे लागले.

कर्जत तालुक्यातील एका गावात रविवारी एक विवाह सोहळा पार पडला. वधू-वर दोन्ही याच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील आहेत. सर्व विधी उत्साहात पार पडले. नवरीच्या पाठवणीच्या आधी वधू-वरांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी वराच्या ताटाला पैशाचे वटकण लावण्याची प्रथा आहे. प्रथेनुसार वधूकडच्यांनी दोनशे रुपयांचे वटकण लावले. मात्र, ही रक्कम कमी असल्याचे सांगून नवरदेव रुसला. जास्त पैशांचे वटकण लावल्याशिवाय जेवणार नाही, अशी भूमिका वरपक्षाकडून घेण्यात आली. ही वाढीव पैशांची मागणी वधूपित्याने फेटाळली. त्यावरून वाद वाढत गेला.

ग्रामस्थांनी मध्यस्थी करत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ झाला तरी वाद मिटत नव्हता. वधूपिता आपल्या निर्णयावर ठाम होता. वर पक्षाने नमते घेऊनही उपयोग झाला नाही. संतापलेल्या वधूपित्याने आपल्या मुलीला सासरी न पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. ज्या कुटुंबाला मुलीपेक्षा पैसा महत्वाचा वाटतो तेथे मुलगी देण्यात अर्थ नाही. आज हा प्रकार घडला, उद्या आणखी काही मागण्या करून त्रास देतील, त्यामुळे आपण मुलीला सासरी न पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे वधूपित्याचे म्हणणे होते. त्यामुळे वातावरण एकदमच गंभीर झाले.

अखेर वर पक्षाने पोलीस ठाणे गाठले. तेथे तक्रार दिली. मात्र, प्रकरण समजुतीतून मिटवावे, असा विचार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे तात्काळ विवाहस्थळी आले. त्यांनी नेमका प्रकार समजून घेतला. वधूपित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते निर्णयावर ठाम होते. मग वधूचे मत घेण्याचे ठरले. ती सज्ञात असल्याने तिच्या लग्नाचा निर्णय घेण्याचा तिला पूर्ण अधिकार असल्याचे पोलिसांनी तिला सांगितले. त्यावर तिनेही आपण वडिलांच्या निर्णयासोबत असल्याचे सांगितले. तेथे पोलिसांचाही नाइलाज झाला. शेवटी वरपक्षाला रिकाम्या हाताने परत जावे लागले.

First Published on: June 22, 2021 4:30 AM
Exit mobile version