पालघरमध्ये डिझेल टँकरला भीषण आग; ज्वाळांनी आसमंत व्यापला

पालघरमध्ये डिझेल टँकरला भीषण आग; ज्वाळांनी आसमंत व्यापला

गेल्या काही दिवसांत राज्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच पालघर जवळील नागझरी मासवण रस्त्यावरील लोवरे येथे डिझेल भरलेल्या टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली असून यामध्ये डिझेल टँकर जळून संपूर्णपणे खाक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा एक्सप्रेस-वे चे काम सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या मोंटे कार्लो या ठेकेदार कंपनीच्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी आलेल्या डिझेलच्या टँकरला लोवरे स्टॉप या ठिकाणी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या टँकरमध्ये डिझेल भरलेले असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले.

दरम्यान या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून नागझरी-मासवण मार्गावरील संपूर्ण वाहतूक थांबविण्यात आली आहे. मात्र डिझेलच्या टँकरला लागलेल्या भीषण आगीने शेजारील घरातील नागरीकांची पळापळ झाली. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालघर नगरपरीषद आणि तारापूर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे.


हेही वाचा – काँग्रेसच्या मित्रपक्षांनी राहुल गांधींच्या विकृत विचारांना नाकारलं, पवारांच्या मुलाखतीवरून भाजपची टीका

First Published on: April 8, 2023 12:51 PM
Exit mobile version