प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँक मजूर घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दरेकरांना देण्यात आले आहेत. मुंबै बँक निवडणुकीमध्ये मजूर म्हणून दरेकरांनी निवडणूक लढवली होती. यावर आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरेकरांना उच्च न्यायालयाने या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. परंतु पोलिसांनी दरेकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. मुंबै बँक मजूर घोटाळ्या प्रकरणी दरेकरांवर अटकेची टांगती तलवार होती. परंतु न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. आता माता रमाबाई पोलीस ठाण्यातून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहावे असे आदेश दरेकरांना देण्यात आले आहेत.

प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूर प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यानंतर दरेकरांनी न्यायालयात धाव घेतली होती. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने दरेकरांच्या बोगस मजूर प्रकरणात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतरच दरेकरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. प्रवीण दरेकर यांची या पूर्वीसुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ३ तास दरेकरांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांचा फोनसुद्धा पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. तसेच पोलिसांवर चौकशीदरम्यान दबाव होता असा आरोप दरेकरांनी केला होता. पुन्हा चौकशीला बोलवल्यास हजर राहणार असल्याचे दरेकरांनी सांगितले होते.

दरेकरांना न्यायालयाचा दिलासा

दरेकरांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यांना ३५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांकडून हमी देण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरेकरांवर आरोप काय?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार म्हणून निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये दरेकरांनी कोट्यावधीची मालमत्ता आणि व्यावसायिक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दरेकरांना आमदार म्हणूनही अडीच लाख रुपयांचे मानधन मिळते त्यामुळे दरेकर मजूर नाहीत हे स्पष्ट होत आहे. परंतु मुंबै बँक निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचे २१ उमेदवार निवडून आले आहेत. दरेकरांनी मुंबई बँकवर आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. सहकार विभागाने दरेकरांना मजूर म्हणून अपात्र का घोषीत करु नये यासाठी नोटीसही पाठवली होती.


हेही वाचा : औरंगजेबच्या कबरीपुढे गुडघे टेकवणाऱ्या ओवैसींना त्याच मातीत गाडू, संजय राऊतांचा ओवैसी बंधूंना इशारा

First Published on: May 13, 2022 11:45 AM
Exit mobile version