माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा; अखेर राज्यपालांचा माफीनामा

माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा; अखेर राज्यपालांचा माफीनामा

राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे आहेत. भरत गोगावलेंची प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षम नोंदवले आहे

मुंबईः मुंबई आणि ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाजूला केल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. त्या लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगत सिंह यांनी केल्यानं मोठा वादंग माजला होता. अखेर त्या विधानावरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर माफी मागितली आहे.

२९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली, असं म्हणत राज्यपालांनी माफी मागितली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतिपथावर अग्रेसर होत आहे, असंही राज्यपालांनी पत्रकात म्हटले आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो, असंही महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणालेत.

मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक : एकनाथ शिंदे

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या योगदानाची कुणालाही अवहेलना किंवा अवमान करता येणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले होते.


हेही वाचाः राज्यपालांच्या विरोधात संतापाची लाट; भाजपसह राज्यातील सर्व पक्षांनी केला निषेध

First Published on: August 1, 2022 7:14 PM
Exit mobile version