घरमहाराष्ट्रराज्यपालांच्या विरोधात संतापाची लाट; भाजपसह राज्यातील सर्व पक्षांनी केला निषेध

राज्यपालांच्या विरोधात संतापाची लाट; भाजपसह राज्यातील सर्व पक्षांनी केला निषेध

Subscribe

महाराष्ट्राचा अवमान केल्याप्रमाणे सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपसह शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

सतत वादग्रस्त विधान करून राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्र आणि मराठी माणसाविरोधी ताज्या वक्तव्याने शनिवारी राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली. या विधानाच्या विरोधात अनेक ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचा अवमान केल्याप्रमाणे सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपसह शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचे सांगत त्यांना फटकारले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे दोघांनी निक्षून सांगितले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना उद्देशून कोल्हापूरी जोडा दाखवण्याची वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने राज्यपालांची उचलबांगडी करण्याची मागणी केली असून मनसेने मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा दिला आहे. आपल्या विधानाबद्दल राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे कळताच राज्यपालांनी माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा केला आहे.महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचे कोश्यारी यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा ट्विटद्वारे राज्यपालांना इशारा

राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अंधेरीतील एका चौकाच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना,कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की मुंबई आणि ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाजूला केल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. पण गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान केले. या विधानावरून राजकीय वातावरणात तापले आहे.

- Advertisement -

मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक : एकनाथ शिंदे

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही ते त्यांचे वैयक्तीक मत आहे. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या योगदानाची कुणालाही अवहेलना किंवा अवमान करता येणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. या मुंबईत इतर राज्यातील लोकही रोजगार करतात. इतर समाजाचे लोकही व्यवसाय, व्यापार करतात. परंतु, मुंबईत जे काही सामर्थ्य आहे, महत्त्व आहे त्यामुळेच. याचे श्रेय इतर कुणालाही घेता येणार नाही. मुंबईत मराठी माणसाच्या अस्मितेचा कुणालाही अवमान करता येणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून मराठी माणसाच्या मागे आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या वाटचालीत मराठी माणसाचे श्रेय : फडणवीस

आम्ही राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचे श्रेय सर्वाधिक आहे. उद्योग क्षेत्रात देखील मराठी माणसाने प्रगती केली असून जगभरात मराठी माणसाचे नाव आहे. महाराष्ट्राच्या विकासात वेगवेगळ्या समाजाचे योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. त्यात गुजराती, मारवाडी समाज असेल पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी उद्योजक, साहित्यिक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक यांचा सहभाग सर्वाधिक आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.

एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अतिशोयोक्ती, अलंकार वापरले जातात. तशाच प्रकारे राज्यपालांनी केले आहे. त्यांच्या मनात मराठी माणूस, महाराष्ट्राबद्दल श्रद्धा आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे, असेही फडणवीस म्हणाले.

राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

दरम्यान, राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई राष्ट्रवादीने आज राज्यपालांच्या निषेधार्थ हुतात्मा चौक येथे आंदोलन केले. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपालांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून १० लाख पत्र राज्यभरातून पाठविण्यात येणार आहेत.

मराठी माणसाला कमी लेखण्याचा हेतू नाही :राज्यपाल कोश्यारी यांचा खुलासा

काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असा खुलासा राज्यपाल कोश्यारी यांनी केला आहे.

पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असे कोश्यारी यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -