राज्यातील डॉक्टरांचे मारहाणीविरोधात कामबंद आंदोलन; ओपीडी सेवा बंद

राज्यातील डॉक्टरांचे मारहाणीविरोधात कामबंद आंदोलन; ओपीडी सेवा बंद

महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेचा ताण आणखी वाढणार, एकाच वेळी शेकडो डॉक्टर होणार निवृत्त

राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स, विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर्स उद्या आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात केंद्रीय मार्ड, अस्मी, आयएमए या सर्व मोठ्या संघटना सहभागी होणार आहेत. शिवाय, हॉस्पिटलमधील डॉक्टर्स सकाळी ओपीडीची सेवा ही बंद ठेवणार आहेत. तसेच, सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान वॉर्डमध्ये ही सेवा दिली जाणार नाही. पण, आपात्कालीन सेवेवर परिणाम होणार नाही, असे या तिन्ही संघटनांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, उद्या काही प्रमाणात रुग्णांच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो.

अस्मी संघटनेचा निषेध

कोलकात्यातील निवासी आणि दोन इंटर्न डॉक्टरांना ११ तारखेला जबर मारहाण झाल्याप्रकरणी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मी यांनी मंगळवारपासून तीव्र निषेध करायला सुरुवात केली आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले त्वरीत थांबवण्यासाठी सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे यासाठी डॉक्टरांच्या सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. शिवाय, सरकार जागतिक स्तरावर आरोग्य योजना बनवण्यात व्यस्त आहेत. पण, आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे, त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे.

सरकार आम्ही कायदा हातात घेऊ याची वाटत पाहत आहे का?, असा सवाल मार्डने उपस्थित केला आहे. आमच्या सुरक्षेसाठी सरकारला वारंवार पत्र लिहून आणि विनंती करून आम्ही थकलो आहोत. आता आमचा संयम संपलेला आहे. त्यामुळे आता कोणतीही पूर्वसूचना न देता कृती केली जाईल, असा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी परिपत्रकात दिला आहे. तर कोलकाता सरकार आणि पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी. याशिवाय देशातील सर्व राज्यांच्या सरकारने राज्यातील हॉस्पिटलची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्रातल्या इंटर्न डॉक्टरांनी केली आहे.

कारवाई करण्यासाठी कायदा नाही

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कायदा नाही. त्यामुळे, नातेवाईक कधीही डॉक्टरांवर हात उचलतात. शिवाय, किती वेळ डॉक्टर्स सुरक्षारक्षकांवर अवलंबून राहणार?, असाही प्रश्न डॉक्टरांनी परिपत्रकात विचारला आहे. त्यामुळे आमच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.


हेही वाचा – ‘डॉक्टर आणि रुग्णांचा संवाद पारदर्शी असणं गरजेचं’

हेही वाचा – रक्तदानासाठी केईएमच्या डॉक्टरांचा पुढाकार


 

First Published on: June 13, 2019 9:05 PM
Exit mobile version