पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली मेट्रोची बोगी

पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली मेट्रोची बोगी

पिंपरी-चिंचवडकरांना आतुरता असलेली मेट्रो अखेर शहरात दाखल झाली. नागपूर येथून तब्बल सात दिवसांचा प्रवास करून सहा बोगी रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्या आहेत. अगदी शहराच्या भक्ती-शक्ती इथे येताच पारंपरिक पद्धतीने मेट्रोच्या बोगीचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचा मार्ग पाच किलोमीटरपर्यंत पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाचा येणार्‍या नववर्षात ट्रायल रन घ्यायचा मानस आहे. पिंपरी ते स्वारगेट असा मेट्रो मार्ग असणार आहे. मेट्रोच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्याचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले होते. नागपूर येथून सहा बोगी २२ डिसेंबर रोजी निघाल्या होत्या. सात दिवसांचा प्रवास करून रविवारी त्या पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्या आहेत.दरम्यान, या बोगी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी त्याचे फोटो देखील घेतले. पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या उपस्थितीत इतर मान्यवरांनी मेट्रोच्या बोगीचे स्वागत केले. या बोगी संत तुकाराम नगर येथे येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, नववर्षात ट्रायल रन घेण्यात येणार असली तरी मेट्रो प्रत्यक्षात धावण्यासाठी किमान चार वर्षांचा अवधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह इतर मान्यवर मेट्रोच्या बोगीच्या स्वागतासाठी थांबले होते. परंतु, मेट्रोच्या बोगीवरील कागद न काढताच स्वागत करण्यास महापौर यांनी नकार दिला होता. मात्र मेट्रो प्रशासनाने काही कारण देत बोगीवरील कागद काढण्यास नकार दिला. अखेर एक तास ताटकळत थांबलेल्या महापौर माई ढोरे यांनी श्रीफळ वाढवून मेट्रोचे स्वागत केले.

First Published on: December 30, 2019 1:59 AM
Exit mobile version