नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव द्यावं – राज ठाकरे

नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव द्यावं – राज ठाकरे

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव द्यावं, असं राज ठाकरे म्हणाले. आमदार प्रशांत ठाकूर तसंच इतरांनी भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून दि. बा. पाटील यांच्या नावाला पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते, असं राज ठाकरेंनी सांगितलं. कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हा ते सांताक्रूझमध्ये आले. नंतर ते सहारपर्यंत गेलं. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असं मला वाटत आहे. हे काही सिडकोनं मंजूर केलं नी राज्यानं प्रस्ताव केला असं नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठपणाबद्दल दुमत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत आहोत या गोष्टींचं भान असायला हवं. जे नाव आहे ते कसं बदलणार? असा सवाल राज ठाकरेंनी केला. बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचच नाव असायला हवं. नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे. खरंतर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारनं रेटा लावला पाहिजे. नावात वैगेरे सगळे लोकं गुंतून राहतात म्हणून ते सोयीचं असतं. महाराष्ट्रात येणारं विमान शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार त्यामुळे त्यांचंच नाव असायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.

“मागे जेव्हा असं विमानतळ बनवायचं ठरलं, जीव्हेकेंना मी विचारलं हे कसलं विमानतळ आहे. त्यांनी माहिती दिली होती, आताचं विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होत आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार,” अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

 

First Published on: June 21, 2021 1:11 PM
Exit mobile version