आता पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार, 21 ते 28 मे च्या दरम्यान होणार सभा

आता पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार, 21 ते 28 मे च्या दरम्यान होणार सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आता पुण्यात धडाडणार आहे. राज ठाकरे यांची लवकरच पुण्यात सभा होणार आहे. एस पी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होईल. सभेला परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिले आहे.

हिंदुत्वाच्या आणि भोंग्याच्या मुद्द्यामुळे राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. या आधी मुंबई, ठाणे, औरंगाबादमध्ये त्यांची सभा झाली. औरंगाबादमधील सभेत महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा राज यांनी केली. त्यानुसार आता पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर 21 ते 28 मे च्या दरम्यान ही सभा होणार आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या सभेत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला. एका शिवसैनिकाने मला विचारले लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? त्यामध्ये संजय दत्तला गांधीजी दिसतात. तशीच एक केस आपल्याकडे आहे. ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. कधी मराठी तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. हा मुन्नाभाई भले तरी करीत होता. हा कुठला मुन्नाभाई. ही केमिकल लोच्याची केस आहे, अशी टिका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केली होती. या टिकेला आता राज ठाकरे पुण्यातील सभेत काय प्रत्युत्तर देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज ठाकरेंचा एका महिन्यातील हा दुसरा पुणे दौरा असणार आहे. याआधी राज ठाकरे 29 आणि 30 एप्रिलला दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते.आता ते मंगळवारपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांची चर्चा करतील. पुण्यात मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी भोंग्याबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला विसंगत भूमिका घेतली. त्यानंतर साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शहर मनसेत धुसफूस सुरु आहे. या दौऱ्यात मनसेमधील नाराजी राज ठाकरे दूर करण्याची चिन्हे आहेत.

 

 

First Published on: May 16, 2022 5:59 PM
Exit mobile version