शरद पवार – राज ठाकरेंच्या ‘विमान भेटी’त काय बोलणं झालं?

शरद पवार – राज ठाकरेंच्या ‘विमान भेटी’त काय बोलणं झालं?

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. काँग्रेसने सत्ताधारी भाजपविरोधात कंबर कसली असून वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये आलोल्या भाजप नेत्यांना लक्ष्य करायला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरूवात केली आहे. त्यासोबतच भाजपला निवडणुकांमध्ये सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कोणत्या पक्षांना सोबत घेऊन आघाडीची मोट बांधता येईल, याचीही चाचपणी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास एकाच विमानातून केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

योग जुळून आला की जुळवून आणला?

राज ठाकरे गेल्या काही दिवासांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळालं. शेवटच्या कार्यकर्त्याशी पक्षाची बांधीलकी जोडली जावी, यासाठी दौऱ्यात राज ठाकरेंचं बदललेलं स्वरूप दिसून आलं. दौरा आटोपून राज ठाकरेंनी औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी विमान प्रवासाचा मार्ग स्वीकारला. मात्र, नेमके याच वेळी शरद पवार देखील त्याच विमानात असल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे. त्यामुळे हा योगायोग कसा जुळून आला? की जुळवून आणला गेला? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच या विमान प्रवासामध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात नक्की कोणती चर्चा झाली? याविषयीही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

राज ठाकरेंनी घेतली विमानात शरद पवारांची भेट

मनसेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही

निवडणुकांसाठी मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. तसा प्रस्ताव दोन्ही पक्षांच्या मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत ठेवण्यातही आला होता. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसकडून आणि विशेषत: संजय निरुपम यांच्याकडून जोरदार विरोध करण्यात आला. मनसेला सोबत घेतल्यास पक्षाला उत्तर भारतीयांच्या मतांचा जोरदार फटका बसू शकतो, असा दावा या बैठकीत निरूपम यांनी केला.


तुम्ही हे वाचलंत का? – २०१९ मध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही-शरद पवार


बदलत्या सत्तासमीकरणांची नांदी?

दरम्यान, या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात नक्की काय चर्चा झाली? याविषयी दोन्हा पक्षांकडून मौन पाळण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्की कोणती सत्तासमीकरणं पाहायला मिळणार? याविषयी सर्वच राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे.

First Published on: October 25, 2018 7:15 PM
Exit mobile version