‘बांगलादेशी दाखवा पाच हजार मिळवा’; मनसेचा नवा फंडा

‘बांगलादेशी दाखवा पाच हजार मिळवा’; मनसेचा नवा फंडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखी घोषणा केली आहे. ‘बांगलादेशी दाखवा पाच हजार मिळवा’ अशा प्रकारची घोषणा समोर येत आहे. औरंगाबादच्या मनसेनं ही घोषणा केली असून पाकिस्तानी, बांगलादेशींची माहिती देणाऱ्यांसाठी स्टॉल उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच माहिती देण्याऱ्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. स्थानिक लोकांना आपल्या परिसरात राहणाऱ्या लोकांबद्दल माहिती असते त्यामुळे मनसेने खास हा फंडा काढला आहे. यापूर्वी मनसेने मुंबई आणि पुण्यात बांगलादेशींना शोधण्यासाठी प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. पुण्यातील मनसे कार्यकर्ते बांगलादेशींना पकडायला गेले आणि स्वतःच अडकले. पकडून देण्यात आलेले बांगलादेशी लोक नसल्याचं समोर आल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांसह आठ ते नऊ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत मनसेने पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोर्चा काढला होता. त्यानंतर मनसे बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक झालेली दिसली. मनसेने विरार येथील अर्नाळा येथून २३ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर मनसेने १३ फेब्रुवारीला बांगलादेशी घुसखोरांविरोधात बोरीवली पूर्व चिकूवाडी परिसरात आंदोलन केले होते. या भागात अनेक दिवसांपासून काही बांगलादेशी महिला आणि पुरुष राहत असल्याचा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा दावा होता.

तसंच काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यानंतर मनसेने ठाणे, बोरिवली या भागात बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी ठाण्यातील किंगकॉंगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौकशीदरम्यान कुटुंबाकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी गोष्टी मिळाल्या. मात्र त्यांच्याकडे बांगलादेशचा पासपोर्टही सापडल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली होती. या सर्व घटनेचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला होता.


हेही वाचा – मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व करीन-मुख्यमंत्री


 

First Published on: February 27, 2020 11:17 AM
Exit mobile version