दुष्काळ जाहीर झाला पण कार्यवाही नाही – मनसे

महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी देखील मात्र प्रत्यक्षात त्याची कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने एकूण १५१ तालुके, २६८ महसूल मंडळे आणि ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात बराच गाजावाजा करून केंद्राची समिती महाराष्ट्रात येऊन गेली. त्यानंतर घाईघाईत त्यांनी काही गावांची देखील पहाणी केली. त्यानंतर केंद्र सरकारच्याच ‘दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६’ प्रमाणे अत्यंत काटेकोर निकष लावून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला खरा परंतु तो नुसता नावालाच. त्यानुसार जबाबदारी म्हणून त्यांनी जे करायला पाहिजे ते त्यांनी केलेलं नाही.

३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर झाल्यापासून महाराष्ट्र सैनिक १५१ तालुक्यांपैकी जवळजवळ प्रत्येक तहसील कार्यालयावर धडकून आले आणि दुष्काळाला तोंड देण्याची स्थानिक प्रशासनाची काय तयारी आहे? याची चौकशी केली. यावर अत्यंत खेदानं म्हणावं लागत आहे की कुठेही दुष्काळाला तोंड देण्याची सरकारची तयारी नाही. हा आढावा घेतल्यानंतर मनसेने सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत.

या आहेत मनसेच्या मागण्या

महाराष्ट्र राज्य कराद्वारे सर्वात जास्त महसूल केंद्राला मिळवून देतो. त्या महाराष्ट्रातली निम्मी जनता आज दुष्काळानं होरपळत असताना केंद्रानं अजून एक दमडी दिलेली नाही. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे महाराष्ट्राची बाजू लावून धरून अधिक निधीची मागणी करावी. असा निधी मागण्यासाठी महाराष्ट्रानं सविस्तर प्रस्ताव केंद्राकडे धाडायला हवा. तो तयार करून पाठवला आहे की नाही याची महाराष्ट्राला ताबडतोब माहिती द्यावी. आमच्या माहितीप्रमाणे या दुष्काळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राला सुमारे २० हजार कोटी रूपयांची गरज लागणार आहे. तशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे करावी.

First Published on: January 17, 2019 3:23 PM
Exit mobile version