ठरलं मनसे लोकसभा लढवणार नाही; मात्र पाठिंबा कुणाला? याची उत्सुकता

ठरलं मनसे लोकसभा लढवणार नाही; मात्र पाठिंबा कुणाला? याची उत्सुकता

मनसेप्रमुख राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकताच आपला १३ वा वर्धापन दिन साजरा केला होता. यावेळी घेतलेल्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले होती, आचारसंहिता लागल्यानंतर लोकसभेबाबतची भूमिका जाहीर करू. त्याप्रमाणे मनसेने आज पत्रक काढून आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक मनसे लढवणार नाही, हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घोषित केले आहे. मात्र लोकसभेसाठी कोणत्या पक्षाला बाहेरून पाठिंबा देणार, हे अद्याप त्यांनी जाहीर केलेले नाही. त्यामुळे मनसेचा पाठिंबा नक्की कुणाला असणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. १९ मार्च रोजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन अधिकृत भूमिका जाहीर करू, असे मागेच राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे आता या मेळाव्यात ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपले सात उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. हे उमेदवार जर जिंकून आले तर ते केंद्रात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील, असे त्यांनी त्यावेळी प्रचारात सांगितले होते. मात्र मनसेचा एकही खासदार २०१४ साली निवडून आला नाही. त्यावेळी राज ठाकरे यांनी पुढील काळात लोकसभा न लढवता फक्त विधानसभेवरच लक्ष केंद्रीत करणार अशी भूमिका मांडली होती.

२०१९ च्या लोकसभेचे चित्र मात्र वेगळे होते. केंद्र सरकारच्या विरोधात वाढता रोष पाहून राज ठाकरे यांनी मोदींच्या विरोधात उघड भूमिका घेतली. तसेच ही लोकसभा निवडणूक लढवणार असेही संकेत दिले होते. राष्ट्रवादीसोबत मनसेची जवळीक मधल्या काळात वाढलेली पाहायला मिळाली. अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक गुप्त बैठकही झाली होती, ज्यामध्ये मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी स्वतः सांगितले होते. मात्र काँग्रेसने सुरुवातीपासून मनसेला विरोध केल्यामुळे मनसेचा आघाडीत प्रवेश होऊ शकला नाही.

 

First Published on: March 17, 2019 6:09 PM
Exit mobile version