वर्ध्यात मोदींचे हिंदू कार्ड

वर्ध्यात मोदींचे हिंदू कार्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात वर्ध्यातील पहिल्या निवडणूक प्रचाराच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी हिंदू दहशवादाचे कार्ड चालवत एकीकडे काँग्रेसला लक्ष्य करताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही टीका केल्याने भाजपसह सगळ्याच पक्षांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे पवार यांच्या बारामतीत जाऊन नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर पवारांची चांगलीच स्तुती केली होती. आता निवडणुकीच्या निमित्ताने चुकीच्या पध्दतीने टीका करून मोदींनी स्वत:चे हसे करून घेतल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांत खूप काही विकास केल्याचा दावा करणार्‍या मोदी यांना हिंदू कार्ड चालवावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गांधीजींचा प्रात:स्मरणीय म्हणून गौरव करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू दहशतवादावरून काँग्रेसवर टीका करण्यासाठी वर्ध्याची निवड केली. यामुळे महात्मा गांधीजींचे अनुयायी तसेच विविध पक्षांतील नेते, कार्यकर्ते मोदींवर नाराज झाले आहेत. भाजपमध्येही मोदींच्या कालच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करत हिंदू दहशतवादाचा मुद्दा इथे काढायला नको होता, असे उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. वर्ध्यातील मोदींच्या सभेकडे सार्‍यांचे लक्ष होते.पण गेली पाच वर्षे विकासाची भाषा बोलणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत विकासाचा एकही मुद्दा काढला नाही. उलट विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढून नवी चाल त्यांनी खेळली आहे. काँग्रेसचे सरकार असताना मालेगाव बॉम्बस्फोट व समझोता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोट हे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे उघड झाल्यावर तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्याला हिंदू दहशतवाद असे संबोधले होते.

वर्ध्यातील सभेत मोदींनी पाकिस्तान, पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक या मुद्दांवरच अधिक भर देत काँग्रेसवर टीका केली. बारामतीचा विकास झाल्याचे तिथे जाऊन सांगणार्‍या मोदींनी ही विकासाची जंत्री दूर ठेवत पवार यांच्या घराणेशाहीवर टीका केली. ही टीका करण्याआधी विकासाच्या मुद्यावर स्वत:च पवारांचे कौतुक केले होते, अशी आठवण राजकीय विश्लेषक देत आहेत. पवारांवरील टीकाही अनेकांना रुचली नाही. मोदी यांना पवारांवर टीका करुन त्यांना अधिक महत्व दिल्याचे भाजपच्याच कार्यकर्त्यांचे मत बनले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेतेही मोदींच्या भाषणावर टीका करु लागले आहेत. शरद पवार यांनी बारामतीत कसा विकास केला, हे मोदी स्वत: सांगत होते. पवारांवर टीका करण्याऐवजी बारामतीचा विकास करायला शरद पवार यांना ५० वर्षे लागली आम्ही ५ वर्षात विकास करु असे मोदींनी सांगितले असते, तर आम्ही त्यांचे स्वागतच केले असते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिली जात आहे.

First Published on: April 3, 2019 4:18 AM
Exit mobile version