आला पाऊस मातीच्या वासात गं… मान्सून अंदमानात… कोकणात झलक!

आला पाऊस मातीच्या वासात गं… मान्सून अंदमानात… कोकणात झलक!

आला पाऊस मातीच्या वासात गं
मोती गुंफीत मोकळ्या केसात गं

आभाळात आले काळे ढग
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासात गं

कवयित्री शांतबाई शेळके यांचे हे गीत ओठी येत आहे आणि त्याला निमित्त ठरले ते सारी धरती ज्याची वाट पाहत होती त्या तोंडावर आलेल्या पावसाचे. मान्सून दक्षिण आंदमानात २५ मे रोजी दाखल झाला असून लवकरच तो केरळकडे वाटचाल करेल. केरळात दाखल झाल्यानंतर तो लवकरच कोकणमार्गे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करेल. विशेष म्हणजे कोकणात रिमझिम बरसात करत मान्सूनने झलक दाखवली आहे.
गेल्या वर्षी ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. यंदा तो त्यापूर्वीच येणार आहे. यानंतर पुढील काही तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसराच्या दिशेने होईल.
यंदा सरासरी पाऊस राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडेल. गेल्या वर्षी ९६ मिलीमीटर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस ९५ टक्के पडला.
यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असे स्कायमेटने नमूद केले आहे.
मान्सूनसाठी अंदमानच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाले आहे, त्यामुळे येत्या ४८ तासात कधीही मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. साधारणपणे २० मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने २३ मेपर्यंत तो अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने मान्सून येण्यास विलंब झाला. पण, मान्सून अंदमानात आला आहे येत्या ६ किंवा ७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे.

यंदा पाऊसमान कसे असेल?
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: ४२ टक्के असेल तर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता १२ टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मान्सून महाराष्ट्रात कधी?
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासात त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात २ ते ३ जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्यावर्षी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी मान्सून राज्यात कधी दाखल होतो, ते पाहणे महत्त्वाचे असेल.

सरासरी पाऊस म्हणजे किती?

८८७.५ मिमी पाऊस सरासरी मानला जातो. त्याच्या १९ टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो. गेल्या वर्षी सरासरीच्या १०६ टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा पहिला अंदाज होता. देशभरात ८६२ मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या ३ टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानले जाते.

First Published on: May 26, 2018 6:48 AM
Exit mobile version