‘त्याने देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’; आव्हाडांनी केली मोदींची हिटलरशी तुलना

‘त्याने देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’; आव्हाडांनी केली मोदींची हिटलरशी तुलना

मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियम नाव दिल्यानं जितेंद्र आव्हाड यांची टीका

अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांची तुलना हिटलरशी केली आहे. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे. दरम्यान, आज नव्या मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन झालं. मोटेरा स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखलं जाणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. नामांतरावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते,” असं ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे.

मोटेरा स्टेडियचं अचानक नामांतर

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मैदानाचं नाव बदलण्यात आलं. हे मैदान मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि संपूर्ण परिसराचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असं करण्यात आलं होतं. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलत नरेंद्र मोदी स्टेडियम असं देण्यात आलं.

 

First Published on: February 24, 2021 5:55 PM
Exit mobile version