मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, खासदार राहुल शेवाळेंची मागणी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, खासदार राहुल शेवाळेंची मागणी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हीच मागणी घेऊन शिंदे गटातील काही खासदार केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात काही खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी आम्ही केलीय, याबाबत प्रक्रिया पूर्ण करू असं शाहांनी सांगितलं आहे, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

राहुल शेवाळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी आम्ही अमित शाह यांच्याकडे केली आहे. याबाबत प्रक्रिया लवकरच पूर्ण करू, असं शाहांनी सांगितलं आहे. इतकचं नाही तर आम्ही पुन्हा एनडीएसोबत आलो आहोत. राज्यातील जनतेला आता अपेक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी शेवाळेंनी केली आहे.

राहुल शेवाळेंनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत मला माहिती नाही. पण या यात्रेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. वरिष्ठ नेत्यांनीही तशा सूचना दिल्याचं सांगितलं जातंय, अशी टीका शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा आज संसदेत संमत झाला आहे. या कायद्याला शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांचा पाठिंबा असल्याची माहिती शेवाळेंनी दिली आहे. मानवी आणि प्राणी यांच्यातील तणाव आजही आहे. वन अधिकार कायद्याचे पालन केले जावे. मनुष्य वस्ती आणि पर्यावरणाचा विचार करता उपाययोजना करण्याची गरज आहे, असं शेवाळे म्हणाले.


हेही वाचा : शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अस्तित्वात नसतानाही तब्बल ७४९ शासन निर्णय जारी


 

First Published on: August 2, 2022 4:58 PM
Exit mobile version