बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊदे – खासदार संजय राऊत

बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊदे  –  खासदार संजय राऊत

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वांद्रे निवासस्थानी मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. राणांच्या आव्हानानंतर मुंबई आणि संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले आहेत. कोणाला स्टंट करायचे असतील तर त्यांना स्टंट करू द्या. कोणाला काहीच फरक पडत नाही. बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊदे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणांवर केली आहे.

…त्यांना मुंबईचं पाणी माहिती नाहीये.

खासदार संजय राऊत यांनी नागपूरमधून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोणाला स्टंट करायचे असतील तर त्यांना स्टंट करू द्या. कोणाला काहीच फरक पडत नाही. त्यांना मुंबईचं पाणी माहिती नाहीये. आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालीसा वाचनं आणि रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे आणि धार्मिक विषय असून हे नौटंकी आणि स्टंटबाजीचे विषय नाहीयेत. भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंटबाजी करून ठेवलेली आहे, त्यातले हे सर्व पात्र आहेत.

बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊदे

बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊदे. कारण आम्हाला काहीही फरक पडत नाही. ही सर्व स्टंटबाजी आहे. तसेच हे फिल्मी लोकं आहेत. स्टंटबाजी आणि मार्केटिंग करणं हे त्यांचं काम आहे. भाजपाची मार्केटिंग करण्यासाठी त्यांना अशा लोकांची गरज भासते. हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची आवश्यकता नाहीये. हिंदुत्व काय आहे हे आम्हाला चांगलंच माहितीये, असं राऊत म्हणाले.

लोकं यांच्या हिंदुत्वाला गांभीर्यानं घेत नाहीत. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारचे सण साजरे करतो. यांचा जेव्हा हिंदुत्वाशी काही संबंध नव्हता. तेव्हापासून आम्ही सगळे मुंबईमध्ये वेगवेगळ्या शोभायात्रा, दसरा आणि गुढीपाडवा साजरे करतो. त्यामु्ळे त्यांना स्टंटबाजी करायची असेल तर त्यांनी करावी, असं राऊत म्हणाले.

हनुमान चालीसा आणि हिंदुत्व हे काय स्टंटचे विषय आहेत का?

राणांना थांबवण्यासाठी मुंबईचे पोलीस आणि शिवसैनिक फार सक्षम आहेत. स्टंट करण्यासाठी काहीही कारण लागत नाही. रामनवमी, हनुमान चालीसा आणि हिंदुत्व हे काय स्टंटचे विषय आहेत का, परंतु भारतीय जनता पक्षाला मार्केटिंगसाठी अशा प्रकारचे सी ग्रेट फिल्मस्टार्स यांची गरज आहेत. अशा लोकांचा उपयोग ते करून घेतात.

संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांवर टीका केली होती. नागपूरमध्ये आल्यावर अनेकांना सदबुद्धी मिळते. संजय राऊतांनाही सदबुद्धी मिळेल, अशी टीका फडणवीसांनी राऊतांवर केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की, नक्कीच या मातीमध्ये तो गुण आहे. या मातीने भलेभले लोकं देशाला दिलेले आहेत. जर आम्हाला सदबुद्धी मिळावी असं जर त्यांना वाटतंय तर तुम्हा सर्वांना का नाही मिळाली. तीच जर सद्बु्द्धी तुम्हाला अडीच वर्षापू्र्वी मिळाली असती. तर कदाचित या राज्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. कदाचित तुम्ही आज मुख्यमंत्री असता. पण आपल्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याची एक वेगळीच सदबुद्धी तुम्हाला मिळाली आणि तुमच्यावर ही वेळ आली आहे.

मातोश्रीवर येणं राणांनी स्वप्नात सुद्धा बघू नये – खासदार अनिल देसाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रत्येक प्रश्नावर मात केली आहे. हे महाविकास आघाडीचं सरकार कशाप्रकारचे अस्थिर करायचं. हे हनुमान चालिसा म्हणतायत परंतु त्यांना तरी म्हणता येते का, पहिल्यांदा पाठांतर तरी करा किंवा त्यांचा अर्थ तरी समजून घ्या. मातोश्रीवर येणं राणांनी स्वप्नात सुद्धा बघू नये, असं खासदार अनिल देसाई म्हणाले.


हेही वाचा : राणांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, विनायक राऊतांचा इशारा


 

First Published on: April 22, 2022 12:28 PM
Exit mobile version