शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यात सोडून सुनील तटकरे माघारी, नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यात सोडून सुनील तटकरे माघारी, नेमकं काय घडलं?

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर (Raigad Fort) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह अनेक बडे राजकीय नेते मंडळीदेखील उपस्थित होते. रायगडावर मोठ्या दिमाखात महाराजांचा हा सोहळा पार पडत आहे. एकीकडे हा सोहळा जंगी स्वरूपात होताना दिसतोय तर दुसरीकडे या कार्यक्रमाच्या वेळी मात्र नाराजी नाट्य पाहायला मिळालं. खासदार सुनील तटकरे या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं असं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते. मात्र, शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यावर आलेला असताना तो सोडून सुनील तटकरे माघारी आले. खाली उतरल्यानंतर सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज मी एक शिवभक्त नागरिक म्हणून येथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. मी या विभागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डावलली गेली? मला माहिती नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित होतो

पुढचा कार्यक्रम राजकीय विचारांचा असेल असं समजून मी तिथून निघालो. एक शिवभक्त म्हणून तिथे झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित होतो, असं सुनील तटकरे म्हणाले. मीही एक स्वाभिमानी असून रायगडचाच असल्यामुळे तिथून आपण निघावं असं मला वाटलं. हा एक सोहळा आहे. त्याला कोणत्याही प्रकारे गालबोट लागेल, असं कोणतंही कृत्य माझ्याकडून होणार नाही, असंही तटकरे म्हणाले.


हेही वाचा : संत निवृत्तीनाथांच्या दिंडीचे आज पंढरपूरला प्रस्थान; रविवारी नाशिक शहरात आगमन


 

First Published on: June 2, 2023 5:25 PM
Exit mobile version