घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंत निवृत्तीनाथांच्या दिंडीचे आज पंढरपूरला प्रस्थान; रविवारी नाशिक शहरात आगमन

संत निवृत्तीनाथांच्या दिंडीचे आज पंढरपूरला प्रस्थान; रविवारी नाशिक शहरात आगमन

Subscribe

नाशिक : माझी जीवाची आवडी पंढरपूरा नेईन गुढी.. या माऊलींच्या अभंगाप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम वारकर्‍यांचे आणि वारकरी संप्रदायातील आद्यपीठ आणि भक्तीपीठ समजल्या जाणार्‍या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी अर्थात पायी दिंडी सोहळा शुक्रवारी (दि. २) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर ५० दिंड्या त्र्यंबकनगरीत दाखल होणार आहेत. १५ ते २० हजार वारकरी या प्रस्थान सोहळ्यासाठी हजेरी लावतात. निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीसमोर वारकरी आल्यानंतर संस्थांतर्फे प्रसादस्वरुपात नारळ दिले जाते. प्रत्येक दिंडीतील टाळकरी, चोपदार, विणेकरी, दिंडीचालक वारकरी व मानकर्‍यांना हा नारळ दिला जातो.

नाशिक तालुक्यातून वैकुंठवासी, बापू बाबा देवरगावकर, हभप काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती वैकुंठवासी जगन्नाथ पवार, वैकुंठवासी तुकाराम महाराज खेडलेकर आदी दिंड्या गेली अनेक वर्षे नाथांच्या पालखीसोबत चालत आहेत. त्याचप्रमाणे मखमलाबाद, अंजनेरी, गंगापूर गाव, नाशिक जिल्ह्यातून निफाड, दिंडोरी पेठ सुरगाणा, कळवण, सटाणा साक्री, मालेगाव इ. ठिकाणांहून मोठ्या संख्येने वारकरी नाथांच्या पालखीसोबत दरवर्षी चालत असतात. या सर्व वारकर्‍यांना नारळ प्रसाद दिल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते. भगूर येथील कलंत्री परिवार परंपरेप्रमाणे हा महाप्रसाद वारकर्‍यांना देतात. महाप्रसाद घेतल्यानंतर प्रस्थानाचे भजन होते.

- Advertisement -

आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिंद्राने बोध गोरक्षासि केला।
गोरक्ष वोळला गाहिनी प्रति
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार
ज्ञानदेवा सार चोज विले॥

हे भजन वारकरी नित्यनेमाने नित्य नेमाने गात असतात. प्रस्थानाच्या प्रारंभीसुद्धा निवृत्तीनाथांचे अनेक अभंग, जी त्यांची गुरुपरंपरा दाखवतात तेही गायले जातात.

- Advertisement -

धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा
शिवे अवतार धरुनी केले त्रयलोक्य पावन
समाधी त्रंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी॥

असा हा संत एकनाथांचा अभंग वारकर्‍यांना नेहमीच प्रेरणा देत आला आहे.
प्रस्थानाचा अभंग झाल्यानंतर निवृत्तीनाथांच्या पादुकांना कुशावर्त तिर्थावर येथे नाथांच्या पादुकांना जलाभिषेक केला जातो. त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष परंपरेप्रमाणे कुशावर्तावर प्रस्थानावेळी हजर असतात. मात्र, यावेळी त्र्यंबक नगर परिषदेवर प्रशासक असल्याने प्रशासकीय स्तरावर तो होईल तेथून पुढे ज्योतिर्लिंग त्र्यंबक राजाच्या महाद्वारावर निवृत्तीनाथांच्या पादुका ठेवून तिथेही अभंग म्हटला जातो.

येथून पुढे त्र्यंबक नगराच्या बाहेर पालखी मार्गस्थ होते. यंदा निवृत्तीनाथांची पालखी प्रथमच त्यांच्या गुरुगृही म्हणजेच गहिनीनाथांच्या मठामध्ये मुक्कामास थांबणार आहे. पंचायती आखाड्यामध्ये हा मुक्काम असून, दुसर्‍या दिवशी अर्थात शनिवार ३ जून रोजी सकाळी काकडा भजन आणि पूजन झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता पालखी सोहळा सातपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.

पालखी सोहळ्यासाठी यावर्षी प्रथमच शासन स्तरावर अनुदान

निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा हा प्रचंड वारकर्‍यांची संख्या असलेला आगळावेगळा असा सोहळा आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ संस्थानतर्फे फिरत्या शौचालयांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, म्हणून मागील अनेक महिन्यांपासून शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. संस्थानचे अध्यक्ष हभप नीलेश गाढवे, सचिव अ‍ॅड. सोमनाथ घोटेकर, पालखी प्रमुख नारायण मुठाळ, तसेच विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख प्रा. अमर ठोंबरे व एकूणच विश्वस्त मंडळाने केलेल्या अथक प्रयत्नाला यानिमित्ताने यश आले आहे. दोन दिवसांपूर्वी फिरत्या शौचालयांसाठी ३० लाखांचे अनुदान शासनातर्फे जाहीर झाले असून, तसे पत्रक संस्थानला प्राप्त झाले आहे. संबंधित ठेकेदाराला याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्र्यंबकेश्वरपासून पंढरपूरपर्यंत एकूण १० ट्रॉलीज सोबत असणार आहेत. एकूण १०० सीट्स या मोबाईल टॉयलेटचे आहेत. यंदा प्रथमच हे अनुदान प्राप्त झाले असून, आगामी कालावधीत शासनाच्या वतीने आर्थिक अंदाजपत्रकात पालखी सोहळ्याच्या खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे, असे संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे-पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -