mpsc: पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबादेत विद्यार्थी रस्त्यावर

फोटो सौजन्य-प्राची बारी

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने mpscची पूर्वपरीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली . यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला असून पुणे, कोल्हापूर, नागपूरसह, औरंगाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील नवी पेठ येथे शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती कोल्हापूर, नागपूर औरंगाबादेतही निर्माण झाली आहे.

१४ मार्चला एमपीएससीची पूर्व परीक्षा आहे. मात्र अचानक MPSC ने पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केलं. तसेच परीक्षेच्या नव्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील, असेही सांगण्यात आले. यामुळे गेले वर्षभर MPSC ची परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी वैतागले आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे एमपीएसची परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तीच परीक्षा आता १४ मार्चला घेण्यात येणार होती. त्यासाठी विद्यार्थ्यांना ओळखपत्रही देण्यात आले होते. पुण्यात तर वेगवेगळ्या जिल्हयातील विद्यार्थी परिक्षा केंद्रावर पोहचलेही होते. पण ऐनवेळी MPSC ने कोरोनामुळे परिक्षा पुढे ढकल्यात आल्याचे पत्रकच जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांचा हिरेमोड झाला. जर निवडणुका होऊ शकतात, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही सुरळीतपणे होतात. तर मग परिक्षा का होत नाहीत असा सवाल करत
पुण्यात विद्यार्थी मोठया संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच पुढील परिक्षेच्या तारखा केव्हा जाहीर होतील हे देखील सांगण्यात आलेले नाही. यामुळे पुण्यानंतर, कोल्हापूर, नागपूर व औरंगाबाद येथेही  विदयार्थी एमपीएससी विरोधात एकत्र आले आहेत. जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. तर यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

First Published on: March 11, 2021 5:38 PM
Exit mobile version