पडघा-शहापूर महामार्गाच्या दुरुस्तीला मिळाला मुहूर्त

पडघा-शहापूर महामार्गाच्या दुरुस्तीला मिळाला मुहूर्त

प्रातिनिधिक चित्र

ठाणे : मुंबई-नाशिक एक्सप्रेस-वे वरील पडघा ते शहापूरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीच्या अधिकार्‍यांचे कान उघडणी केली. तातडीने पावले उचलून या मार्गावरील कामे तातडीने करण्यात यावीत, असे निर्देश दिले. त्यानंतर सर्व्हिस रोडचे काम तसेच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

पडघा टोल नाका येथे गेल्या आठ वर्षांपासून टोलवसुली सुरू आहे. परंतु, कंपनीने त्यावेळी ठरलेल्या करारनाम्यानुसार वेळच्या वेळी खड्डे भरणे, अंडरपास, सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलांची कामे पूर्ण केली नसल्याने आतापर्यंत महामार्गावर शेकडो अपघात होऊन सहाशेच्या वर नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण आहे. याबाबत शिवसेनेने वारंवार आंदोलने करूनही कंपनीने अपूर्ण कामे पूर्ण केली नाहीत. याची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, टोल कंपनीचे अधिकारी आणि शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन खड्डे भरण्याचे तसेच सर्व्हिस रोडचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.

उड्डाणपूलाचे काम तीन महिन्यात

जव्हार फाटा सर्व्हिस रोड, वाशाला उड्डाणपूल,खर्डी गोलभन ते रेल्वे पुलापर्यंत सर्व्हिस रोड,भातसा उड्डाणपूल, कांबारे अंडरपास व सर्व्हिस रोड, शहापूर चेरपोली ते परिवार गार्डन हॉटेल दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, आसनगाव परिवार हॉटेल उड्डाणपूल, खातिवली-वाशिंद एण्ट्री उड्डाणपूल, वाशिंद जिंदाल कंपनी समोर उड्डाणपूल व खातिवली ते जिंदाल कंपनी सर्व्हिस रोड, कांदली डोहाळे कोशिंबी अंडरपास, खडवली फाटा उड्डाणपूल, पडघा एण्ट्री अंडरपास व पडघा बायपास टोल नाक्यापर्यंत दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, तळवली फाटा उड्डाणपूल, भोईरपाडा अंडर पास या सर्व मागण्यांची दखल शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. सर्व्हिस रोडचे काम तातडीने सुरू करून महिन्याभरात अंडरपासचे काम सुरू करण्याचे, तसेच मंजुरी मिळालेल्या सहा उड्डाणपुलांबरोबर उरलेल्या अन्य उड्डाणपुलांची मंजुरी मिळवून त्यांची कामे तीन महिन्यांत सुरू करण्याचे मान्य केले.

First Published on: September 25, 2018 2:30 AM
Exit mobile version