मुंबईतही करोनाचा चाचणी अहवाल मिळणार, पुण्याच्या धर्तीवर कस्तुरबात प्रयोगशाळा

मुंबईतही करोनाचा चाचणी अहवाल मिळणार, पुण्याच्या धर्तीवर कस्तुरबात प्रयोगशाळा

देशाच्या राजधानीत करोना व्हायरसच्या रुग्णांची वाढत असल्याने मुंबईतही भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे. कस्तुरबा रुग्णालयांमध्ये पुण्याच्या धर्तीवर प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये रुग्णाचे चाचणी अहवाल अवघ्या तीन ते पाच तासांमध्ये उपलब्ध होत असून भविष्या कस्तुरबासह राजावाडी, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा रुग्णालयासह जोगेश्वरीतील हिंदुह्दहयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येत आहेत. यामध्ये २५ ते १०० खाटांची क्षमता असेल असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

चीन,थायलंडसह परदेशात असलेल्या करोना व्हायरसचा संसर्ग आता देशासह इतर राज्यांमध्ये पसरु लागला आहे. यासंदर्भात मुंबईत काय उपाययोजना केली आहे याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्थायी समितीच्या सभेत तसेच महापौर व उपमहापौरांसमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या कस्तुरबा रुग्णालयात दिवसभरात तीन रुग्ण दाखल झाले आहे. मात्र, यासर्वांचे वैद्यकीय नमुना चाचणी अहवाल नकारात्मक आले आहे. आतापर्यंत कस्तुरबा उपचार घेणार्‍या १० रुग्णांना सोडण्यात आले आहे. परंतु त्यांच्या संपर्कात महापालिकेची डॉक्टर असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

आतापर्यंत विमानतळावर ६२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. परंतु त्यातील ३७५ रुग्णांना सोडून देण्यात आले आहे. कस्तुरबा रुग्णालयात सध्या २८ खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयाला केंद्र व राज्य सरकारच्या पथकाने भेट देवून वॉर्डची पाहणी केली. याठिकाणी  यासाठी लागणारी औषधे व प्रतिबंधक उपचार तसेच अ‍ॅप्रन आणि मास्क पुरेसे आहेत. तसेच स्थानिक स्तरावर रुग्णालयांना ते खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

याशिवाय वांद्रे भाभा, कुर्ला भाभा,राजावाडी रुग्णालय आणि हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्यात येत आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात २५ खाटा असल्या असल्या तरी भविष्यात १०० खाटांपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. याशिवाय उपनगरातील तिन्ही रुग्णालयात सुरुवातील २५ खाटांची क्षमता असेल. तिथेही १०० खाटांपर्यंत वाढवल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.

कस्तुरबा रुग्णालयात दोन ओपीडी तयार करण्यात आल्या आहे. ज्यामध्ये एक जलद ओपीडी तयार करून अशा रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जात असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. त्यामुळे देशातील कोणत्याही भागातील रुग्णावर उपचार करण्यासाठी महापालिका सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कस्तुरबा रुग्णालयातच चाचणी अहवाल

आजवर करोना व्हायरसच्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय चाचणी केल्यानंतर रक्तांचे तसेच इतर नमुने पुण्यातील एनआयबी या प्रयोगशाळेत पाठवले जायचे. परंतु त्यानंतर केंद्र व राज्य सरकारला कळवून पुण्याच्या धर्तीवर कस्तुरबा प्रयोगशाळेत अशाप्रकारच्या चाचणी करण्याची परवागी मागण्यात आली. त्यानुसार दहा रुग्णांचे चाचणी अहवाल हे पुण्यातील प्रयोगशाळेप्रमाणे आल्यानंतर केंद्राने महापालिकेला कस्तुरबा प्रयोगशाळेत अशाप्रकारची चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार रुग्णांच्या वैद्यकीय चाचणींचे अहवाल बनवले जात असून तीन ते पाच तासांमध्ये हे अहवाल मुंबईतच प्राप्त होत असल्याने रुग्णांवर उपचार करणे सोपे जात आहे. यामध्ये एका मशिनवर ९० नमुन्यांची चाचणी करणे शक्यत आहे, तर छोट्या मशीनवर २४ नमुन्यांची चाचणी केली जावू शकते,असे काकाणी यांनी स्पष्ट केले. राज्यातील ही दुसरी मोठी प्रयोगशाळा असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: March 4, 2020 8:12 PM
Exit mobile version