२ लाखांच्या बनावट सॅनिटायजर्सवर छापा

२ लाखांच्या बनावट सॅनिटायजर्सवर छापा

बनावट सॅनिटायजर्स

करोना व्हायरसच्या भितीमुळे हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे बाजारात अनेक बनावट सॅनिटायजर्सची उत्पादने येत आहेत. विषाणुंना प्रतिबंध करणारे खरे सॅनिटायजर्स कोणते असा पेच सध्या ग्राहकांना पडला आहे. त्यामध्येच आता एफडीएने केलेल्या कारवाईत बाजारात बनावट हॅण्ड सॅनिटायजर्सची उत्पादने विकण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे.

बनावट कंपनीचे सॅनिटायजर्स

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने दोन दिवसात राज्यभर केलेल्या कारवाईत जवळपास २ लाख किंमतीची बनावट सॅनिटायजर्स जप्त केली आहेत. या सॅनिटायजर्समध्ये विषाणु मारण्याची कोणतीही गुणवत्ता आढळली नाही, असे लक्षात आल्यानेच या बनावट सॅनिटायजर्स बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एफडीच्या टीमने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लक्षात आले आहे की, सॅनिटायजर्सच्या नावाने अनेक आयुर्वदिक उत्पादने बाजारात येऊ लागली आहेत.

कांदिवलीतील एका वितरकाच्या गोडाऊनमध्ये टाकलेल्या छाप्यात जवळपास २ लाख किंमतीची बनावट हॅण्ड सॅनिटायजर्स जप्त करण्यात आली आहेत. भिवंडीतील एका कंपनीने या हॅण्ड सॅनिटायजरचे उत्पादन केले आहे. पण एफडीच्या छाप्यानंतर या कंपनीने दोन वर्षांपूर्वीच आपला परवाना एफडीएला परत केला असल्याचे उघड झाले. कंपनीने अनधिकृत पद्धतीने हे हॅण्ड सॅनिटायजर्स वितरकांना आणि केमिस्टला विकायला सुरूवात केली होती. अशा पद्धतीच्या बनावट सॅनिटायजरमुळे या कंपनीने ड्रग एण्ड कॉस्मेटिक अॅक्टचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कंपनीवर या कायद्यान्वये दंडात्मक कारवाई होणार हे आता स्पष्ट आहे. पण संपुर्ण तपासा दरम्यान कंपनीने बनावट सॅनिटायजर बनवल्याची कबुली दिली असल्यानेच त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली नाही असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बायोटोल (Biotol) या नावाने हे हॅण्ड सॅनिटायजर विकण्यात येत होते. प्रत्यक्षात या नावाची कोणती कंपनीच अस्तित्वात नसल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. आणखी एका धाडीमध्ये वाकोल्यातील एका वितरकाकडून खोट्या उत्पादनांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संस्कार आयुर्वेद या नावाने ही उत्पादने बाजारात विकण्यात येत होती. ही उत्पादने एण्टी बॅक्टेरियल म्हणून बाजारात विकण्यात येत होती. या उत्पादनांवर असलेला हेल्पलाईन नंबरही बंद होता असे आढळले आहे.

First Published on: March 13, 2020 8:07 AM
Exit mobile version