१०मे पर्यंत माजी महापौर किशोरी पेडणेकर राणी बागेतील बंगला सोडणार

१०मे पर्यंत माजी महापौर किशोरी पेडणेकर राणी बागेतील बंगला सोडणार

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणी बागेतील महापौर बंगला खाली करायला सुरुवात केली आहे. येत्या १० मे पर्यन्त त्या संपूर्ण त्यांचे सामान परळ, सनमिल कंपाउंड येथील घरात शिफ्ट करून बंगला खाली करणार आहेत.
याबाबतची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेची गेल्या २५ वर्षांपासून सत्ता आहे. त्यातच भाजपचे संख्याबळ कमी पडल्याने त्यांनी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी महापौर, उप महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार न दिल्याने आणि विरोधी पक्षानेही उमेदवार न दिल्याने किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर पदी बिनविरोध निवडून आल्या. तेव्हापासून त्या राणी बागेतील महापौर बंगल्यात आपल्या कुटुंबियांसमवेत राहत आहेत. आता ७ मार्च रोजी १४ व्या मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आली. त्यामुळे सर्व नगरसेवकांचे पद संपुष्टात आले. साहजिकच किशोरी पेडणेकर यांचे महापौर पदाची मुदत, अन्य महत्वाच्या समितीच्या अध्यक्षपदे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. ते सर्वजण ‘आजी नगरसेवक’ ऐवजी ‘माजी नगरसेवक’ माजी महापौर, माजी अध्यक्ष झाले.

मात्र महापौर पदाच्या कार्यकाळात मुंबईसाठी विकासकामे करताना, मुंबईचा कारभार हाताळताना आणि पालिकेतील पहारेकरी भाजपला सडेतोड उत्तरे देत, त्यांचा प्रत्येक बाबतीत “सामना” करीत महापौर पदाची अडीच वर्षे कधी व कशी काय निघून गेली, हे आता माजी महापौर झालेल्या किशोरी पेडणेकर यांना कळलेच नाही.

मात्र महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही काही कारणास्तव त्यांनी महापौर बंगला वापरू देण्याची विंनती मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांना केली होती. ती त्यांनी मान्य केल्याने किशोरी पेडणेकर या आजपर्यंत राणी बागेतील बंगल्यात वास्तव्य करू शकल्या. मात्र महापौर पद गेल्यानंतरही त्या आजही काळजीवाहू माजी महापौर म्हणून व मुंबईचे दायित्व स्वीकारून काम करीत आहेत.

मात्र आता महापालिकेची मुदत संपून म्हणजे महापौर पद जाऊन दोन महिने झाले. आता त्यांनी स्वतःहून राणी बागेतील महापौर बंगल्यातील आपले सामान लोअर परळ, सनमिल कंपाउंडमधील इमारतीतील जुन्या ५५० चौ. फुटाच्या घरात शिफ्ट करायला सुरुवात केली आहे. येत्या १० मे पर्यंत सदर बंगल्यातील सर्व सामान त्या आपल्या जुन्या घरी शिफ्ट करून पुढे त्याच घरात राहायला जाणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत राजकारणाचे धडे घेऊन तयार झालेल्या धाडसी शिवसैनिक म्हणून त्यांचा दबदबा होता त्यामुळेच त्यांना २२ नोव्हेंबर २०१९ च्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे महापौर झाल्यानंतरही त्यांनी मुंबईचा व पालिका सभागृहाचा कारभार हाताळताना काही धाडसी निर्णय घेतले. पहारेकरी भाजपचा मुकाबला केला.

आता मात्र महापौर बंगला सोडताना त्यांना या बंगल्यातील आठवणी दाटून येत आहेत. महापौर बंगल्यातील कामकाज, राणीच्या बागेतील सहवास, पहाटेच्या सुमारास पक्षांची किलबिल, बंगल्याच्या अवारातील सुगंधित फुलांच्या सडा, त्यांनी पाळलेल्या दोन वासरांची हंबरडा, महापौर बंगल्यावर सामान्य जनतेची विविध कामांसाठी होत असलेली रेलचाल हे सारेकाही त्यांना आठवत असून अडीच वर्षे ज्या महापौर बंगल्यात वास्तव्य केले त्या बंगल्याला खाली करताना व आपल्या जुन्या घरी जाताना त्यांच्या भावना दाटून येत आहेत.


हेही वाचा : उत्तर प्रदेशातील रस्त्यांवरील धार्मिक कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय


 

First Published on: May 8, 2022 9:11 PM
Exit mobile version