सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले होते. याप्रकरणी ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधींनी  केलेल्या विधानामुळे ठाण्यातील स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांच्या या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ठाण्यात निषेध मोर्चाही काढला होता.

पोलिसांनी राहूल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही आज मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर संध्याकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.


श्रद्धा हत्या प्रकरण : आफताबच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ, नार्को टेस्टला मंजुरी

First Published on: November 18, 2022 7:27 AM
Exit mobile version