Devendra fadnavis Inquiry : मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी जाणार

Devendra fadnavis Inquiry : मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी जाणार

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस सागर या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. पोलीस बदली घोटाळा प्रकरणी चौकशीला हजर राहण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. मात्र, भाजपने बीकेसी स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. त्यामुळे ठाकरे सरकार विरूद्ध भाजप यांच्यातला संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार असल्याचा निर्णय राज्याच्या गृहमंत्रालयाने घेतला आहे.

सहपोलिस आयुक्त गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस बदल्यांमधील घोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्याप्रकरणी मार्च २०२१ मध्ये फडणवीसांनी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन घोटाळ्याची माहिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचा भंग झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी फडणवीसांना प्रश्नावली नोटीस पाठवली होती. परंतु पोलीस जी काही माझी चौकशी करतील. त्याला योग्य ते उत्तर मी देणार आहे, असं फडणवीस म्हणाले होते.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्याच्या संदर्भातील माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे, त्यानंतर मला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून उद्या मी ११ वाजता बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. मात्र, राज्याच्या गृहमंत्रालयाच्या बैठकीनंतर मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी जाणार आहेत.

पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याचा अहवाल गेली सहा महिने सरकारकडे पडून होता. त्या अहवालात कोणी किती पैसे दिले आहेत. पैसे देऊन कोण कुठल्या पोलीस ठाण्याला गेले आहे किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेले, अशी सगळी संवेदनशील माहिती अहवालात आहे. परंतु, सहा महिने सरकारने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

पोलिसांच्या बदल्यांमध्ये होणाऱ्या घोटाळ्याची माहिती मी त्याच दिवशी केंद्रीय गृह सचिवांना भेटून सुपूर्द केली. या माहितीचे गांभीर्य ओळखून, न्यायालयाने या संदर्भातील सगळी चौकशी सीबीआयकडे सुपूर्द केली आहे. या बदली घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत असून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा : Devendra Fadnavis : मुंबई पोलिसांची फडणवीसांना नोटीस, उद्या बीकेसीत राहणार हजर


 

First Published on: March 12, 2022 5:53 PM
Exit mobile version