महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे एकला चलो रे!

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे एकला चलो रे!

मुंबई – महाविकास आघाडीमध्ये घटकपक्ष म्हणून सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसने अखेर महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये होणार्‍या महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा किल्लाही काँग्रेस एकट्याने लढवणार आहे.

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना दिले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कसल्याही तडजोडी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या महापालिका निवडणुका रंगतदार होणार आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या कित्येक दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी ठाम होते. त्यांनी वारंवार घटक पक्षातील सहकार्‍यांना कोंडीत पकडले होते. टीकाही केली होती. आता त्यांनी आक्रमक होत थेट आदेशच दिल्याने सारे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी काळात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका आहेत.

महाआघाडीतील घटक पक्ष असणार्‍या काँग्रेसने पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काय करणार, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये आघाडी होणार का याचीही चर्चा रंगत आहे. मात्र, काल सातारा जिल्हा बँक निवडणुकीत झालेला प्रकार पाहता शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे ही शक्यता कमी वाटते.

First Published on: November 25, 2021 4:48 AM
Exit mobile version