विम्याच्या ११ कोटींसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, कोब्राचा दंश देत मनोरुग्णाचा केला खून

विम्याच्या ११ कोटींसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, कोब्राचा दंश देत मनोरुग्णाचा केला खून

प्रातिनिधिक फोटो

राजूर : विम्याचे ११ कोटी २५ लाख रुपये मिळण्यासाठी अमेरिकेतून भारतात आलेल्या एकाने चौघांच्या मदतीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. अकोले तालुक्यातील राजूरमध्ये घडलेल्या या घटनेत पाचही संशयितांनी एका निराधार मनोरुग्णाचा कोब्राचा दंश करत खून केल्याचेही उघड झाले. राजूर पोलिसांनी या प्रकरणात ५ संशयित आरोपींना अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेहून परतलेले प्रभाकर भिमाजी वाघचौरे व संदीप तळेकर (रा. पैठण, ता. अकोले), हर्षद रघुनाथ लहामगे (रा. राजूर, ता. अकोले), हरीश रामनाथ कुलाळ (रा. कोंदणी, ता. अकोले), प्रशांत रामहरी चौधरी (रा. धामणगाव पाट, ता. अकोले) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नवनाथ यशवंत आनप (वय ५०, रा. धामणगाव आवारी, ता. अकोले) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघचौरे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र जिवंत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यांचा शोध घेतला असता ते बडोदा (गुजरात) येथे सापडले.

पोलिसांच्या चौकशीत वाघचौरे सुमारे २० वर्षांपासून कुटुंबासह अमेरिकेत राहत होते. ते जानेवारी २०२१ मध्ये भारतात आले. सासर असलेल्या धामणगाव पाट (ता. अकोले) येथे ते राहत होते. त्यांनी १५ लाख अमेरिकन डॉलर म्हणजे ११ कोटी २५ लाख रुपयांचे विमा कवच घेतले होते. हे पैसे लाटण्यासाठी प्रभाकर वाघचौरे, संदीप तळेकर, हर्षद लहामगे, हरिष कुलाळ, प्रशांत चौधरी यांनी कट रचला. तिघांनी एका व्यक्तीचा मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात आणला. मृताचे नातेवाईक असल्याचं ओळखपत्र दाखवत शवविच्छेदनही केलं. त्यानंतर पाच जणांनी संगनमताने मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची कबुली या पाचही जणांनी पोलीस चौकशीत दिली.

असा शिजला कट

संशयितांनी संगनमताने विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एका व्यक्तीकडून विषारी सापाच्या दंशाने वाघचौरे यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्याचं ठरवलं. त्यानुसार वाघचौरे यांनी राजूरमध्ये एका महिन्यासाठी एक खोली भाड्याने घेतली. हर्षद लहामगे यांनी सर्पदंशासाठी एक विषारी नाग आणला. वाघचौरे व प्रशांत चौधरी यांनी एका मनोरुग्णाला खोलीवर आणले. त्याला शुक्रवारी (दि. २२) पहाटे वाघचौरे, लहामगे व कुलाळ यांनी नागाचा दंश दिला. त्यात मनोरुग्णाचा मृत्यू झाला. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी पोस्ट मार्टेम रिपोर्ट आणि इतर कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पोलिस तपासात हा बनाव उघड झाला.

First Published on: October 26, 2021 7:51 PM
Exit mobile version